
पत्नीसोबत ट्रेनमधून आरामदायी प्रवास करायचा होता, मात्र ट्रेनमध्ये जागाच नव्हती. यामुळे जागा मिळवण्यासाठी एका व्यक्तीने अशी शक्कल लढवली ज्यामुळे त्याची थेट तुरुंगात रवानगी झाली. पट्ठ्याने थेट पोलिसांना फोन करून ट्रेनमध्ये बॉम्ब आणि दहशतवादी असल्याची माहिती दिली. यानंतर एकच गोंधळ उडाला. तपासात ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले आणि पोलिसांनी आरोपीचा शोध घेत बेड्या ठोकल्या.
मोनू सक्सेना असे आरोपीचे नाव आहे. मोनू पत्नीसोबत बिहारहून दिल्लीला जाणाऱ्या विक्रमशीला एक्प्रेसमधून प्रवास करत होता. मोनू भागलपूरहून दिल्लीला चालला होता. त्याला पत्नीसोबत आरामदायी प्रवास करायचा होता, मात्र ट्रेनमध्ये बसायला जागाच नसल्याने त्यांना स्लीपर कोटमधील शौचालयाजवळ बसावे लागले. यामुळे त्याने शक्कल लढवली.
ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची माहिती दिली तर प्रवासी घाबरून उतरतील आणि आपल्याला जागा मिळेल असे त्याला वाटले. त्यामुळे त्याने ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची खोटी माहिती रेल्वे पोलीस आणि यूपी पोलिसांना दिली. यानंतर एकच गोंधळ उडाला. ट्रेनला अलीगढ स्थानकावर थांबवण्यात आले. बॉम्बशोधक पथक आणि डॉग स्क्वॉडला बोलावून ट्रेनची तपासणी केली असता ही माहिती असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर पोलिसांनी फोन कॉल करणाऱ्याचं लोकेशन ट्रेस केलं असता सोनू सक्सेना नामक व्यक्तीने हा कॉल केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी त्याचं फोन लोकेशन ट्रेस करत त्याला भरथना-इटावाजवळून अटक केली. त्याची चौकशी केली असता ट्रेनमध्ये जागा मिळवण्यासाठी आपण हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सोनूची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.




























































