
चंदीगडमध्ये IDFC First बँकेत 590 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्याच्या घटनेला महिना उलटत नाही तोच कोटक महिंद्र बँकेत एफडी घोटाळा समोर आला आहे. हरियाणातील पंचकुला महानगरपालिकेच्या मुदत ठेव पावत्यांमध्ये (FDRs) विसंगती असल्याचे उघडकीस आले आहे. कोटक महिंद्रा बँकेतील महानगरपालिकेचे सुमारे 160 कोटी रुपये गायब झाले आहेत.
महानगरपालिकेने 58 कोटी रुपयांच्या एका FD ची मुदत संपल्यानंतर ती रक्कम आपल्या खात्यात जमा करण्याची विनंती केली असता हा घोटाळा उघडकीस आला. महानगरपालिकेने मुदत ठेव म्हणून जमा केलेली ही रक्कम बनावट खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचा आरोप आहे. पालिकेला या बदल्यात बँकेकडून दिलेली कागदपत्रेही बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.
बँकेच्या स्टेटमेंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाल्याचे दिसत होते, मात्र प्रत्यक्षात पालिकेच्या खात्यात एक रुपयाही शिल्लक नव्हता. याबाबत सखोल चौकशी केली असता पैसे आधीच गायब झाले होते आणि बँकेने दिलेले स्टेटमेंट बनावट होते, असे दिसून आले.
पंचकुला महानगरपालिकेने या प्रकरणाची तक्रार राज्य दक्षता विभागाकडे केली आहे. तसेच बँकेविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिकेने या बँकेला काळ्या यादीत टाकण्याची विनंती हरियाणा सरकारकडे केली आहे. या घोटाळ्यात बँकेच्या कर्मचाऱ्यांसोबतच महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.


























































