
‘ऑपरेशन सिंदूर’वर लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा इतिहास उगाळला. फाळणीपासून पहलगामपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी नेहरू आणि काँग्रेसलाच जबाबदार धरले. ‘सिंदूर’वर बोलताना मोदींनी काही दिवसांपूर्वी बिहारच्या प्रचारसभेत केलेल्या भाषणातील मुद्देच पुन्हा मांडले. ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा असे जगातील कोणत्याही नेत्यांनी आम्हाला सांगितले नव्हते, असे त्यांनी सांगितले खरे, पण 100 मिनिटांच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव घेणे टाळले.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या मुद्दय़ावर विरोधकांनी आज सलग दुसऱ्या दिवशी लोकसभा दणाणून सोडली. हिंदुस्थान-पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा दावा करणाऱया डोनाल्ड ट्रम्प यांना पंतप्रधानांनी उत्तर का दिले नाही, असा सवाल विरोधकांनी केला होता. त्यावर पंतप्रधानांनी भूमिका मांडली.
काँग्रेसने पाकव्याप्त कश्मीर का सोडले?
मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेस व नेहरूंवरही टीका केली. ‘काँग्रेसने नेहमीच राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली. इंडस् वॉटर ट्रीटी करून हिंदुस्थानच्या वाटय़ाचे 80 टक्के पाणी पाकिस्तानला दिले. ‘पाकव्याप्त कश्मीर’ पाकिस्तानकडे कोणी जाऊ दिले याचे उत्तर स्पष्ट आहे. 1962-63 मध्येही काँग्रेसने जम्मू-कश्मीरचा काही भाग सोडून दिला. 1971 च्या युद्धात 93 हजार पाकिस्तानी आपल्या पैदेत होते, 1000 चौरस किमीवर आपण ताबा मिळवला होता. त्याचवेळी पाकव्याप्त कश्मीर घेता आले असते, असे म्हणत मोदींनी इंदिरा गांधी यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेसच्या काळातच देशात दहशतवाद फोफावला. काही नेत्यांनी अफझल गुरूचेही समर्थन केले, असा आरोपही त्यांनी केला.’
‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही सुरू
‘याआधी दहशतवादी हल्ले करून निवांत झोपायचे, आता त्यांची झोप उडाली आहे. हिंदुस्थान कोणताही टोकाचा निर्णय घेऊ शकतो हे आता पाकिस्तानला कळले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही सुरू आहे, असेही मोदी म्हणाले.’
अमेरिकेचे उपाध्यक्ष तासभर फोन करत होते!
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यासाठी मला जगातील कोणत्याही नेत्याने फोन केला नाही. 9 मेच्या रात्री अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हेन्स तासभर मला पह्न करण्याचा प्रयत्न करत होते, पण मी त्यांचा पह्न उचलला नाही. त्यानंतर मी स्वतः फोन लावला व चर्चा केली. पाकिस्तान मोठय़ा हल्ल्याची तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर ‘गोळीला उत्तर बॉम्बने मिळेल, पाकिस्तानला महागात पडेल,’ असे उत्तर मी त्यांना दिल्याचे मोदी म्हणाले.