चारधाम यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू; 19 एप्रिलपासून यात्रेला प्रारंभ, घरबसल्या नोंदणी करता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमधील प्रसिद्ध चारधाम यात्रा 2026 येत्या 19 एप्रिलपासून सुरू होणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. चारधामसाठी जाणाऱ्या भाविकांना आता घरबसल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा व्हॉट्सअ‍ॅपवरून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चारधामसाठी जाणाऱ्या सर्व भाविकांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणी केल्यानंतर नेमके किती भाविक यात्रेला येणार आहेत, याची माहिती कळू शकेल, तसेच प्रवाशांची संख्या पाहून प्रशासन सुरक्षा आणि गर्दीचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकेल.

19 एप्रिल रोजी चारधामला यात्रा सुरू होणार असून परंपरेनुसार याच दिवशी यमुनोत्री आणि गंगोत्री धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जातील. त्यानंतर 22 एप्रिलला केदारनाथ आणि 23 एप्रिलला बद्रीनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जातील. सध्या केवळ ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ऑफलाइन नोंदणी 17 एप्रिलपासून सुरू केली जाणार आहे. चारधाम यात्रा सुरू होण्यापूर्वी हरिद्वार, ऋषिकेश सह अनेक प्रमुख ठिकाणी बायोमेट्रिक नोंदणी काउंटर लावले जातील, यामुळे ज्या भाविकांकडे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही तेही सहजपणे नोंदणी करू शकतील.

ऑनलाइन नोंदणी कशी कराल?

ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी सरकारने वेबसाईट, मोबाईल अ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा उपलब्ध केली आहे. उत्तराखंड सरकारच्या registrationandtouristcare.uk.gov.in या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करू शकतात. Tourist Care Uttarakhand हा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करूनही नोंदणी करू शकतात. तसेच सरकारने व्हॉट्सअ‍ॅपद्वारेही नोंदणीची सुविधा दिली आहे. यासाठी 8394833833 या क्रमांकावर “Yatra” असे लिहून मेसेज पाठवणे आवश्यक आहे.