EVM हा देशातील ब्लॅक बॉक्स; विश्वासार्हतेबाबत राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न

देशातील लोकसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी अनेक पक्ष करत होते. तसेच ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात होते. आता लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एखदा ईव्हीएमच्या विश्वासार्हतेचा प्रश्न उपस्थित केला आहे. रविवारी एक्सवर एक पोस्ट करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

राहुल गांधी यांनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित एक बातमीही शेअर केली आहे. वायकर यांच्यावर EVM मध्ये छेडछाड करुन विजयी झाल्याचा आरोप आहे. ही बातमी शेअर करत राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, EVM हा भारतातील ‘ब्लॅक बॉक्स’ आहे. त्याच्याशी छेडछाड करण्यास कोणालाही परवानगी नाही. देशातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांमध्ये जबाबदारी आणि उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाहीत लबाडी होते आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते, असे त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी मिड डे न्यूजचे वृत्त शेअर केले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पांडिलकर यांच्यावर ईव्हीएमशी छेडछाड केल्याचा आरोप आहे. त्यांच्या छेडछाडीमुळेच वायकर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अवघ्या 48 मतांनी विजयी झाले. मतमोजणीच्या वेळी मंगेश जो फोन वापरत होता, तो इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनला (ईव्हीएम) जोडल्याचा आरोप आहे. ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी मोबाईल फोन वापरण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.