चिकन खाणे जीवावर बेतले, घशात हाड अडकल्याने गुदमरून रिक्षा चालकाचा मृत्यू

सुट्टी दिवशी कुटुंबासोबत चिकनचा आस्वाद घेताना हाड घशात अडकल्याने रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. सुरेंद्र असे मयत रिक्षा चालकाचे नाव आहे. सुरेंद्रच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. सुरेंद्रच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुरेंद्र यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा एकमेव कमावता आधार हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत.

तेलंगणातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातील येल्लारेड्डीपेट मंडलमधील गोल्लापल्ली येथे ही घटना घडली. 45 वर्षीय सुरेंद्र हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. रविवारी सुट्टी असल्याने सुरेंद्र यांच्या घरी चिकन बनवले होते. कुटुंबासोबत ते जेवणाचा आस्वाद घेत होते. यादरम्यान चिकन खाताना हाड त्यांच्या घशात अडकले. यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.