
कार आणि पिकअपची समोरासमोर धडक झाल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील गंगा एक्सप्रेसवेवर गुरुवारी रात्री हा अपघात घडला. अतिवेगामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. दोन्ही वाहने एकाच लेनवर आल्याने एकमेकांवर आदळली. पीडित कुटुंब अमरोहचे रहिवासी असून नामकरण समारंभासाठी आपल्या मूळ गावी गेले होते. तेथून परतत असतानाच काळाने घाला घातला. त्यांची कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या भाजीपाला भरलेल्या पिकअप ट्रकला धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढचा भाग पिकअपमध्ये अडकला. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने वेगळी केली.
रेणू, भास्कर, रिया, देववती, गीता आणि कपिल अशी मृतांची तर रोहित आणि जय अशी गंभीर जखमींची नावे आहेत. पिकअपचा चालक आणि क्लीनर देखील अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे.


























































