
खेळ विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. देशाचे राष्ट्रीय पिस्तूल प्रशिक्षक अंकुश भारद्वाज यांच्यावर एका 17 वर्षीय अल्पवयीन नेमबाज मुलीने लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून भारद्वाज यांच्याविरोधात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची दखल घेत नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने (NRAI) कठोर पाऊल उचलले असून अंकुश भारद्वाज यांना निलंबित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 6 जानेवारी 2025 रोजी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. ही घटना नवी दिल्लीतील डॉ. करणी सिंह शूटिंग रेंजमध्ये एका राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेदरम्यान घडली. तक्रारीनुसार, प्रशिक्षक भारद्वाज यांनी खेळासंदर्भात चर्चा करण्याच्या बहाण्याने या मुलीला फरिदाबाद येथील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. सुरुवातीला तिला हॉटेलच्या लॉबीमध्ये भेटण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर दबाव टाकून तिला हॉटेलच्या खोलीत नेले आणि तिथे तिचा लैंगिक छळ केला. या घटनेनंतर प्रशिक्षकाने पीडित मुलीला धमकीही दिली होती. जर तिने या प्रकाराबद्दल कोणालाही सांगितले तर, तिचे क्रीडा करिअर उद्ध्वस्त करण्याची आणि तिच्या कुटुंबाला नुकसान पोहोचवण्याची भीती त्याने दाखवली होती. या धमकीमुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. मात्र, घरी परतल्यानंतर तिने धैर्याने सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पालकांनी विनाविलंब पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
या प्रकरणावर बोलताना नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव पवन कुमार सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत, अंकुश भारद्वाज निलंबित राहतील आणि त्यांना संघटनेचे कोणतेही काम दिले जाणार नाही. सध्या फरिदाबादच्या एनआयटी महिला पोलीस स्टेशनकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलीस सर्व पुरावे गोळा करत आहेत. या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशिक्षकांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.



























































