
आंतरराष्ट्रीयसह राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील 331 पदकविजेत्यांना रोख पारितोषिकाने गौरवित करून पुण्यात जल्लोषात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. खेलो इंडियासह आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी 58 कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर करून रोख बक्षिसे ही खेळाडूंना कष्टाला दिलेली दाद असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग सभागृहात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रोख पारितोषिकाने 13 आंतरराष्ट्रीय, 318 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्स सेंटरच्या लोगोचे अनावरण पवार व क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे, आमदार बाबाजी काळे, क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, सहसंचालक सुधीर मोरे, नामदेव शिरगांवकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
सलग दुसऱयांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचे द्विशतक झळकावून महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अभिमानास्पद कामगिरी केली असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या वतीने खेळाडूंचे काwतुक होत आहे. रोख पारितोषिके ही त्यांच्या कष्टाला, योगदानाला दिलेली दाद आहे. खेलो इंडियासह इतर खेळाडूंच्या बक्षिसांसाठी 58 कोटी अतिरिक्त निधी देण्याची क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची मागणीही आपल्या भाषणात पवार यांनी मंजूर केली. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय उभा करण्याचा निर्णय घेतला आहे असेही अजित पवार म्हणाले.