राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग कामगारांचे प्रश्न सोडवण्यास आग्रही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळावी, कंत्राटदारी पद्धत बंद करावी तसेच लाड-पागे समितीच्या नियमांमधील चुकांची सुधारणा करावी, यासह अनेक मागण्यांबाबत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी. पी. वावा यांच्याबरोबर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अन्य सनदी अधिकारी आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदभाई परमार यांची सकारात्मक चर्चा झाली.

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी. पी. वावा हे पाच दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांनी नुकतीच राज्यातील सफाई कामगारांच्या समस्यांबाबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याबरोबर बैठक घेत सफाई कर्मचार्यांच्या मागण्या आणि समस्यांचा आढावा घेतला. बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव, नगर विकास प्रधान सचिव, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेस काकानी, संजीवकुमार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस सफाई कामगार सेल तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार उपस्थित होते.

त्यांनी सफाई कामगारांच्या विविध समस्या आयोगाच्या सदस्यासमोर मांडल्या. यावर सविस्तर चर्चा होऊन आयोगाने मुख्य सचिव आणि मुंबई महानगरपालिकेच्या दोन्ही अतिरिक्त आयुक्तांना गोविंदभाई परमार यांना स्वतंत्ररीत्या बैठक देऊन हा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे लाड-पागे समितीच्या नियमांमध्ये झालेल्या चुका दोन आठवडय़ांत सुधारण्याचे आश्वासन दिले.