
विधिमंडळाच्या सभागृहात रमी खेळताना व्हिडीओत पकडले गेलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात बळीराजा आक्रमक झाला आहे. कोकाटे हटाव…महाराष्ट्र बचाव मोहीमच विरोधी पक्षाने हाती घेत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. राष्ट्रवादीक काँग्रेसने कोकाटेंच्या घरासमोर निदर्शने करून त्यांचा निषेध केला गेला.
पिकांना मिळणारा मातीमोल भाव, महागडी बियाणे यासह अनेक संकटांमुळे राज्यातील शेतकरी चिंताग्रस्त असताना विधानसभा अधिवेशनावेळी जंगली रमी खेळणाऱया कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी महाराष्ट्रात तीव्र निदर्शने केली. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करत कोकाटे यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली. नागपूर, पुणे, लातूर, बीड, सांगली, जळगाव, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, धुळे जिह्यांत राष्ट्रवादीने कोकाटेंविरोधात निदर्शने केली.
रस्त्यात रमीचा डाव मांडून निषेध
नाशिकमध्ये महायुतीत सरकारचा धिक्कार असो, कृषिमंत्री कोकाटे राजीनामा द्या, अशी मागणी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच रमीचा डाव मांडून कृषिमंत्र्यांचा निषेध केला. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फोटोचे खेळण्यातल्या पत्त्यासह महाळुंगे पडवळ येथे दहन करण्यात आले.
जाहिरात स्कीप करायला 42 सेपंद लागतात का? – रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कृषिमंत्री कोकाटे यांचे रमी खेळतानाचे आणखी दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यावेळी सभागृहाचे कामकाज संपले होते आणि मोबाईलवर आलेली जंगली रमीची जाहिरात स्कीप करत होतो, असा दावा कोकाटे यांनी केला होता. त्यावर जाहिरात स्कीप करायला 42 सेपंद लागतात का, असा सवालही रोहीत पवार उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात रमीला राजमान्यता द्या – अंबादास दानवे
कृषिमंत्री कोकाटे यांनी रमी खेळत होतो हे आता कबूल करावे, त्यांच्यामुळे मुख्यमंत्री हतबल झाले आहेत, अजित पवार यांनीच वाढदिवसानिमित्त कोकाटेंचा राजीनामा घेऊन महाराष्ट्राला गिफ्ट करावा, नाहीतर सरकारने रमीला राजमान्यता देऊन तसा जीआर तातडीने काढावा, असा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला.