
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर बोलत असताना जातिवाचक विधाने करू नका, सर्वांशी प्रेमाने वागा, असा वडिलकीचा सल्लाही शरद पवार यांनी दिला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी घोषित केल्या जाऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालीही आज राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांनी मार्गदर्शन करताना निवडणुकीसाठी सज्ज व्हा असे निर्देश दिले.
आपल्याकडे इच्छुकांची आणि काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ज्या तरुणांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, अशांना संधी द्या. स्थानिक पातळीवर नव्या पिढीला संधी देणं ही आपली जबाबदारी आहे.’
राज्यात वाचाळवीर वाढलेत
राज्यात वाचाळवीर वाढलेत हे दुर्दैव आहे असे म्हणत, अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या जातिवाचक विधानाचा यावेळी शरद पवार यांनी निषेध केला. पूर्वी आपल्या पक्षात असणारे एक आमदार सध्या जाती-जातीत तणाव निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे, जातीधर्मावर राजकारण करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही, याची आठवण त्यांनी करून दिली.