ओला उबर चालकांचा संप, प्रवाशांचे हाल; रिक्षा-टॅक्सी चालकांकडून प्रवाशांची लूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ॲप-आधारित कॅब आणि ऑटो-रिक्षा चालकांच्या देशव्यापी एकदिवसीय संपामुळे शनिवारी मुंबईतील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. विशेषतः लांब अंतराच्या प्रवासासाठी आणि विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाहन मिळण्यात अडचणी आल्या. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून त्यांची लूट केली. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

शहरात नियमित मीटर रिक्षा उपलब्ध असल्या तरी ॲप-आधारित सेवांची कमतरता जाणवत होती. आंतर-उपनगरी प्रवासासाठी सहसा ॲप-आधारित सेवांचे भाडे स्वस्त आणि निश्चित असल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला.

सायनहून गोरेगावला जाणाऱ्या शिक्षिका सुचित्रा लोंढे (54) यांनी सांगितले की “मी आणि माझी मुलगी सकाळी सायनहून गोरेगावला जात होतो. कॅब मिळावी म्हणून आम्ही जवळपास एक किलोमीटर चालत गेलो. तीनही ॲपवर प्रयत्न केला, पण कॅब किंवा रिक्षा मिळाली नाही. परतीच्या वेळी भाडे सुमारे 800 रुपयांपर्यंत दाखवत होते, जे सहसा 400 ते 450 रुपये असते. इतके भाडे देण्याची तयारी असूनही वाहन मिळाले नाही,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी विमानतळाकडे जाणारे प्रवासी सर्वाधिक अडचणीत सापडले. अंधेरी पूर्व रेल्वे स्थानकातून टर्मिनल 2 कडे जाणारे माधव झा (35) यांनी सांगितले, “संपाबद्दल मला माहिती नव्हती. जवळपास अर्धा तास कॅब बुक करण्याचा प्रयत्न केला. रॅपिडोवर भाडेही वाढवून पाहिले, पण कोणीही स्वीकारले नाही. शेवटी फ्लाइट चुकू नये म्हणून मीटर रिक्षा घेतली.”

अंधेरी पश्चिमहून टर्मिनल 2 कडे जाणारे व्यावसायिक विनीत नांबियार (38) म्हणाले, “सुरुवातीला मीटर रिक्षा घेण्याचा प्रयत्न केला, पण चालकांनी नकार दिला. त्यानंतर उबर आणि रॅपिडोवर प्रयत्न केला, मात्र 20 मिनिटांपासून ‘ड्रायव्हर शोधत आहोत’ असा संदेशच दिसत आहे. विमानतळाकडे जाताना ही अनिश्चितता त्रासदायक आहे.”

अंधेरी पूर्वहून पवईकडे जाणारे मुकेश कुमार (28) म्हणाले, “लांब अंतरासाठी मी सहसा उबर किंवा रॅपिडो वापरतो, कारण भाडे कमी असते. या मार्गासाठी मी साधारण 150 ते 180 रुपये देतो, तर मीटर रिक्षाचे भाडे 220 ते 250 रुपये पडते. आज ॲपवरच 220 रुपयांपर्यंत भाडे दाखवत होते. त्यामुळे मी थेट रिक्षा घेण्याचा निर्णय घेतला.”

दरम्यान, बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा सुरू असल्याचा आरोप करत आणि ॲप-आधारित कंपन्यांच्या मनमानी भाडेधोरणाविरोधात चालक संघटनांनी हा संप पुकारला. तसेच, शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात परिवहन विभाग अपयशी ठरत असल्याचा आरोपही संघटनांनी केला.

गोरेगावमधील रिक्षाचालक वसीम खान म्हणाले, “पांढऱ्या नंबर प्लेटच्या बाईक टॅक्सी बेकायदेशीर असूनही सुरू आहेत. ॲप कंपन्यांनी या सेवा थांबवाव्यात आणि चालक व प्रवासी दोघांसाठीही न्याय्य भाडे निश्चित करावे.”

महाराष्ट्र कामगार सभा आणि इंडियन गिग वर्कर्स फोरमचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर म्हणाले, “आंतर-उपनगरी लांब प्रवासासाठी ॲप सेवांचे भाडे सहसा कमी आणि सोयीचे असते, हे आम्हाला माहीत आहे. मात्र चालकांना आर्थिकदृष्ट्या तोटा सहन करावा लागत आहे. इंधन, देखभाल आणि परवान्याचा खर्च वाढत असताना कंपन्यांची कमिशन मोठी आहे. त्याचवेळी बेकायदेशीर बाईक टॅक्सी कोणत्याही सुरक्षाव्यवस्था किंवा विम्याशिवाय सुरू आहेत.”

पॅनिक बटन नियमांमुळेही चालकांवर आर्थिक ताण वाढल्याचे त्यांनी सांगितले. “केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या 140 उपकरण पुरवठादारांपैकी जवळपास 70 टक्के राज्याने अमान्य केले आहेत. आधीच बसवलेली उपकरणे बदलण्यासाठी चालकांना सुमारे 12,000 रुपये खर्च करावा लागत आहे, जो रोजंदारीवर जगणाऱ्यांसाठी मोठा बोजा आहे,” असे त्यांनी नमूद केले.

दिवसभर ॲप-आधारित सेवा मर्यादित राहिल्याने प्रवाशांना लांब अंतरासाठी मीटर रिक्षांवर अवलंबून राहावे लागले. दरम्यान, ओला, उबर आणि रॅपिडो कंपन्यांकडून तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.