शंभराव्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जब्बार पटेल

516

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या 100 व्या ऐतिहासिक नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची निवड झाली आहे. नाट्य परिषदेच्या घटनेनुसार नाटय़संमेलन अध्यक्षपदासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. त्याप्रमाणे डॉ. जब्बार पटेल आणि ख्यातनाम अभिनेते मोहन जोशी यांच्या नावांचे अर्ज परिषदेला मिळाले होते. या दोन अर्जांवर कार्यकारी समितीची चर्चा झाली असून एकमताने पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. येत्या 15 डिसेंबर रोजी होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीत पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल अशी माहिती नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि प्रवक्ते मंगेश कदम यांनी दिली.

तरुणांच्या मनातील रंगभूमी घडवायचीय! डॉ. जब्बार पटेल यांचा आशावाद

मराठी रंगभूमी समृद्ध मानली जाते. तिच्या अपेक्षा पूर्ण करण्याची संधी संमेलनाध्यक्षपदाने मला दिली आहे. त्या दृष्टीने काम करतानाच तरुणांच्या मनातील रंगभूमी घडवायची आहे, अशा भावना डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केल्या.

100 व्या  ऐतिहासिक नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. जब्बार पटेल यांनी दैनिक ‘सामना’शी संवाद साधला. नाट्यपरिषदेने फार मोठा बहुमान दिल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर  मराठी रंगभूमीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. ते म्हणाले, भावी रंगभूमी तरुणांच्या हातात आहे. तरुण मंडळी खूप छान विचार करीत आहेत.  नवनवीन संकल्पना राबवत आहे. मला अशा वेगळ्या पद्धतीचा विचार करणार्‍या तरुणांसोबत संपर्क वाढवायचा आहे. त्यासाठी ही संधी मला मिळाली आहे.  

मराठी रंगभूमीला वैश्विक स्तरावर नेऊया

महाराष्ट्राच्या रंगभूमीचे हिंदुस्थानच्या रंगभूमीशी असलेले नाते शोधायचे आहे. बरेच दिवस तशी देवाण-घेवाण झालेली नाही. विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड, मोहन राकेश यांच्या काळात ती झाली होती. आपली नाटकं अन्य भाषांत पोहचली पाहिजेत, त्या भाषेतील नाटकं आपल्या भाषेत आली पाहिजे. हिंदुस्थानच्या पातळीवर हे खूप मोठे आव्हान मला वाटत आहे, असे डॉ. पटेल म्हणाले. मराठी रंगभूमीला तिचे अधिष्ठान प्राप्त करून देण्यासाठी जेवढे करता येईल तेवढे करू, असे आवाहन त्यांनी केले.  

जब्बार पटेल यांचा प्रकास

डॉ. जब्बार पटेल यांनी अनेक चित्रपट-नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी ‘सामना’, ‘सिंहासन’,  ‘जैत रे जैत’, ‘मुक्ता’,  ‘एक होता विदूषक’ आदी दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या  ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटाने अनेक पुरस्कार मिळवले आहेत. प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचे पटेलांनी दिग्दर्शन करून ते परत रंगमंचावर आणले होते. या नाटकाने विक्रमी प्रयोगांची नोंद केली आहे. ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘माणूस नावाचे बेट’, ‘वेड्याचे घर’ या नाटकांत त्यांनी अभिनय केला आहे. थिएटर अकादमी या प्रायोगिक नाट्यसंस्थेची डॉ. पटेल यांनी स्थापना केली आहे. 2014 साली त्यांना ‘विष्णुदास भावे पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. पुणे विद्यापीठाच्या ‘जीवनसाधना’ पुरस्कारसह दिल्लीच्या ‘संगीत नाटक अकादमी’च्या पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या