नावेद 2 मच्छिमार नौका प्रकरण; मुंबईच्या यलो गेट पोलीस ठाण्याचा तपास महत्वाचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जयगड समुद्रात बुडालेल्या नावेद 2 या मच्छिमार नौकेचा शोध अजून सुरुच आहे. ही घटना 20 नॉटिकल मैलाच्या बाहेर घडल्याचा अंदाज असल्याने मुंबईच्या यलो गेट पोलीस ठाण्याकडे हा तपास हस्तांतरीत झाला आहे. या प्रकरणात आता यलो गेट पोलीस ठाण्याचा तपास महत्वाचा ठरणार आहे.

दहा दिवस उलटले तरीही समुद्रात बुडालेल्या नौकेचे अवशेष आणि पाच खलाशांचे मृतदेह सापडत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि शोध यंत्रणा नक्की काय करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. 26 ऑक्टोबर रोजी जयगड येथील नावेद 2 ही नौका मासेमारीसाठी समुद्रात गेली होती. समुद्रात गेल्यानंतर काही काळाने त्यांचा संपर्क तुटला. या नौकेचे काय झाले असा प्रश्न उपस्थित होत असतानाच नौकेवरील सहा खलाशांपैकी एका खलाशाचा मृतदेह सापडला.

समुद्रामध्ये वादळ किंवा वारा नसताना ही नौका बुडाली कशी हा प्रश्न मच्छिमारांनी उपस्थित करताना मालवाहू जहाजाची धडक बसून हा अपघात झाला असल्याचा अंदाज वर्तवला आहे. सध्या नक्की समुद्रात काय घडले याचा शोध पोलीस यंत्रणा करत आहे. 20 नॉटिकल मैलाच्या बाहेर दुर्घटना घडल्याचा अंदाज असल्याने हा तपास मुंबईच्या यलो गेट पोलीस ठाण्याकडे हस्तांतरीत झाला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही जयगड येथील मासेमारीसाठी गेलेली नौका आणि त्यावरील खलाशी अद्यापी का सापडत नाहीत, असा सवाल जि. प. चे माजी उपाध्यक्ष आणि मच्छिमार नेते महेश नाटेकर यांनी उपस्थित केला आहे.