सुशिक्षित मातेने केली सहा वर्षाच्या मुलीची हत्या, हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा रचलेला बनाव उघड

अडखळत बोलते आणि बोलताना जास्त हिंदी शब्दांचा उपयोग करते म्हणून एका निर्दयी सुशिक्षित मातेने आपल्या सहा वर्षीय मुलीची हत्या केल्याचा प्रकार कळंबोली येथील सेक्टर १ मधील गुरू संकल्प सोसायटीत घडला आहे. मुलीची हत्या केल्यानंतर या महिलेने तिचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा बनाव केला. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात तिने आपल्या पोटच्या गोळ्याला संपवल्याचे उघड झाले असून तिला गजाआड करण्यात आले आहे.

बीएस्सीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या महिलेचा विवाह २०१७ मध्ये आयटी अभियंता असलेल्या तरुणाबरोबर झाला होता. २०१९ मध्ये या दाम्पत्याला मुलगी झाली. ही मुलगी बोलताना अडखळत होती. तिला व्यवस्थित बोलता येत नव्हते. तसेच ती बोलताना मराठीपेक्षा हिंदी शब्दांचा अधिक वापर करीत होती. त्यामुळे तिची आई मानसिक तणावाखाली होती. अशी मुलगी आपल्याला नको, असे तिने अनेक वेळा पतीला सांगितले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. शुक्रवारी तिने आपल्या मुलीची हत्या केली. या महिलेची सासू आणि पती घरी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या मुलीचा मृत्यू श्वसन मार्गात अडथळा आल्यामुळे झाल्याचे वैद्यकीय तपासात पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी या मातेची कसून चौकशी केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली.