नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव; भाजप आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकुरांच्या बैठकीला दांड्या, 24 ऑगस्टपासून आरपारची लढाई

 

 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाची फाईल केंद्र सरकारने दाबून ठेवली आहे. मात्र आता दिबांच्या नावासाठी आरपारची लढाई करण्याचा इशारा सर्वपक्षीय कृती समितीने दिला आहे. यासाठी २४ ऑगस्ट रोजी पनवेल मध्ये पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. दरम्यान नामकरणाच्या मुद्यावर जाणीवपूर्वक मूग गिळून बसणारे भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांच्याविरोधात संताप व्यक्त होत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्यात खोके सरकार आल्यानंतर हा प्रस्ताव धूळखात पडला असून केंद्र सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे. आता नामकरणाचा संघर्ष अधिक तीव्र करण्यासाठी २४ ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली.

भाजप आमदारांची मिठाची गुळणी का?

विमानतळ नामकरण कृती समितीमध्ये सर्वच राजकीय तसेच सत्ताधारी, विरोधी पक्षांचे आमदार, खासदार, नेते, मंत्री, पुढाऱ्यांचाही समावेश आहे. मात्र अनेक बैठकांना सत्ताधारी पक्षांचे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक गैरहजर राहतात. भाजप आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी बैठकीलाही उपस्थित राहत नाहीत. त्यांनी या प्रश्नावर मिठाची गुळणी का घेतली आहे असा संताप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.