नवी मुंबई विमानतळ सीआयएसएफच्या ताब्यात; डिसेंबरमध्ये टेक ऑफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सीआयएसएफने (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल) बुधवारी ताब्यात घेतले. सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सीआयएसएफला सुमारे ४५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्यापासून या विमानतळावरून प्रवासी आणि मालवाहतूक सेवा सुरू होणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी झाले. त्यानंतर हे विमानतळ सुरक्षेचा सेटअप बसवण्यासाठी सीआयएसएफच्या ताब्यात दिल जाणार होते. मात्र उद्घाटनानंतर तब्बल २० दिवसांनी हे विमानतळ सीआयएसएफने ताब्यात घेतले. ही अधिकृत घोषणा सीआयएसएफचे महासंचालक प्रवीर राजन यांनी आज केली. यावेळी ते म्हणाले की, आजचा दिवस आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. देशातील ७१ व्या विमानतळाला आम्ही सुरक्षा पुरवत आहोत. नवी मुंबई विमानतळावरून प्रवासी आणि मालवाहतूक विमान सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे आमच्यावर मोठी जबाबदारी असून ती पेल वण्यास सीआयएसएफ तयार आहे. जागतिक दर्जाची सुरक्षा व्यवस्था या विमानतळावर तैनात करण्यात येणार आहे, असेही प्रवीर राजन यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी अतिरिक्त महासंचालक बिनिता ठाकूर, कॅप्टन बी. व्ही. जी. के. शर्मा, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आदी उपस्थित होते.

900 जवान तैनात
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सीआयएसएफने ताब्यात घेतल्यानंतर लगेच सुरक्षा यंत्रणांचा सराव सुरू केला. बुधवारी या विमानतळावर सुमारे ९०० जवान तैनात करण्यात आले. विमानतळ कार्यान्वित होईपर्यंत विमानतळावर सीआयएसएफच्या जवानांची संख्या सुमारे दोन हजारांपर्यंत जाणार आहे. सीआयएसएफ जवानांच्या मदतीला स्थानिक पोलिसांचेही पथक असणार आहे. विमानतळावर तैनात करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवी मुंबई पोलीस दलाने इमिग्रेशनचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या विमानतळावरून डिसेंबर महिन्यात प्रवासी आणि मालवाहतूक विमान सेवा सुरू होणार आहे. त्यादृष्टीने सुरक्षा यंत्रणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विमानतळावर प्रवेश नियंत्रण, प्रवासी व सामान तपासणी, कार्गो तपासणी, क्विक रिअॅक्शन टीम, बॉम्ब डिटेक्शन आणि डिस्पोजल स्कॉड आणि डॉग युनिट्स कार्यरत राहणार आहेत.