
सत्तेत सहभागी असतानाही एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे वनमंत्री गणेश नाईक यांना बकासुरसम्राट तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टेंडरसम्राट पुरस्कार शिवसेना आणि मनसेच्या वतीने आज जाहीर करण्यात आले. महापालिकेत एकनाथ शिंदे यांनी तीन हजार कोटींचा टेंडर घोटाळा केला असल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे, तर नाईक यांनी अडवली भुतवलीमध्ये साडेतीनशे एकरचा भूखंड हडप केल्याचा कांगावा शिंदे गटाकडून सुरू आहे. एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या या दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घेऊन त्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणीही शिवसेना आणि मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी आता फक्त दोन दिवसांचा कालावधी उरलेला असताना नवी मुंबईत गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. दोन्ही नेते सत्तेत सहभागी असताना एकमेकांवर गंभीर आरोप करीत आहेत. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेच्या वतीने दोन्ही नेत्यांना हे पुरस्कर जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांची घोषणा आज तुर्भे येथील योगी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, शिवसेना जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, विधानसभाप्रमुख अतुल कुळकर्णी, मनसेचे विलास घोणे आदी उपस्थित होते.
पालिका शाळांमध्ये हिंदी सक्तीची होणार
महापालिका निवडणुकीसाठी भाजपने तयार केलेल्या जाहीरनाम्यामध्ये मोठ्या प्रमाणात थापेबाजी करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकांच्या शाळांमध्ये मराठीसह हिंदी भाषाही सक्तीची करण्यात येणार असल्याचे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात नमूद केले आहे. भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरे अद्याप नियमित झालेली नाहीत. मात्र भाजपने ही घरे नियमित केली असल्याचे बिनधास्तपणे सांगून प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल केली आहे असे प्रवीण म्हात्रे यांनी सांगितले.





























































