
परिवहन समिती सदस्यांच्या निवडीवरून नवी मुंबई महापालिकेच्या आज झालेल्या पहिल्या महासभेत प्रचंड गोंधळ उडाला. ही निवड महापौर सुजाता पाटील यांनी पक्षीय बलाबलनुसार न घेता निवडणूक पद्धतीने घेऊन शिंदे गटाला कात्रजचा घाट दाखवला. एकही सदस्य परिवहन समितीवर न गेल्यामुळे शिंदे गटाच्या नगरसेवकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी करून महापौरांना घेराव घातला. त्यामुळे महापौरांना महासभेचे कामकाज सुमारे अर्धा तासासाठी तहकूब करावे लागले. परिवहन समितीवर सर्व १२ सदस्य भाजपचे निवडून आले आहेत.
नवी मुंबई महापालिकेची तहकूब महासभा आज पार पडली. या सभेत परिवहन समिती सदस्य निवडीचा विषय चर्चेला आला आणि वादाला सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते विजय चौगुले, मनोज हळदणकर, किशोर पाटकर यांनी परिवहन समितीवर जाणाऱ्या सदस्यांची निवड पारंपरिक पद्धतीने पक्षीय बलाबलनुसार करण्यात यावी, अशी मागणी केली. मात्र त्यांच्या या मागणीला सभागृह नेते सागर नाईक आणि भाजपचे नगरसेवक सूरज पाटील यांनी कडाडून विरोध केला. या समितीवर जाणारे सदस्य जर सभागृहातून जाणार असतील तर त्यांची संख्या पक्षीय बलाबलनुसार असणार आहे.
जर सभागृहाबाहेरचे सदस्य निवडले जाणार असतील तर त्यांच्यासाठी सभागृहात मतदान होणार आहे. अशी भूमिका सागर नाईक यांनी घेतल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळात महापौर सुजाता पाटील यांनी काही सदस्यांची निवड केली. मात्र विरोधकांनी त्यांना घेराव घातल्यानंतर त्यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. नंतर उर्वरित सदस्यांची निवड करण्यात आली.
मनमानी कारभार
नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाल्यापासून परिवहन समितीवर पक्षीय बलाबलनुसार सदस्य जात आहेत. विद्यमान सभागृह नेते सागर नाईक हे २०१० ते २०१५ या कालावधीत महापौर होते. त्यावेळीही महासभेतील सर्वच पक्षांच्या संख्याबळानुसार परिवहन समितीवर सदस्य गेले होते. आता मात्र मनमानी पद्धतीने फक्त स्वतःच्या पक्षाच्या सदस्यांची निवड करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी व्यक्त केली.
महासभेत निवड झालेल्या परिवहन सदस्यांमध्ये विकास झंजाड, यशपाल ओव्हाळ, अभिजित पेडणेकर, विनोद म्हात्रे, राहुल शिंदे, राजश्री कातकरी, रोशन पाटील, हनुमंत रोडे, कुणाल महाडिक, तीर्था सकपाळ, राजेश राय आणि शीतल भोईर यांचा समावेश आहे.































































