
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेने (एनएमएमटी) रक्षाबंधननिमित्त महिलांना विशेष भेट दिली आहे. अटल सेतूमार्गे महिलांसाठी दोन विशेष बसेस चालवण्याचा निर्णय एनएमएमटी प्रशासनाने घेतला आहे. या सेवेचा शुभारंभ उद्यापासून होणार आहे. एक बस नेरुळ स्थानकातून सकाळी ८.०५ वाजता वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दिशेने रवाना होणार आहे, तर दुसरी बस खारघरमधून सकाळी ८ वाजता वर्ल्ड ट्रेड सेंटरसाठी सोडण्यात येणार आहे.
महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या विशेष बससेवेसाठी एनएनएमटी प्रशासनाने ११६ आणि ११७ हे नवीन बस मार्ग तयार केले आहेत. ११६ क्रमांकाच्या मार्गावर बससेवा नेरुळ ते वर्ल्ड ट्रेड सेंटरदरम्यान चालवली जाणार आहे. ही बस सायंकाळी ६.२५ वाजता वर्ल्ड ट्रेड सेंटर येथून पुन्हा नेरुळच्या दिशेने रवाना होणार आहे. ११७ क्रमांकाच्या मार्गावरील बस खारघर सेक्टर ३५ ते वर्ल्ड ट्रेड सेंटरदरम्यान धावणार आहे. ही बस वर्ल्ड ट्रेड सेंटर येथून सायंकाळी ६.५० वाजता पुन्हा खारघरच्या दिशेने रवाना होणार आहे. यापूर्वी एनएमएमटीच्या दोन बसेस अटल सेतूमार्गे धावत आहेत. आता अटल सेतूमार्गे धावणाऱ्या बसेसची संख्या चार होणार आहे. उद्या सकाळी या बसेस अटल सेतूमार्गे रवाना होणार आहेत.
महिला प्रवाशांची संख्या लाखापार
एनएमएमटीच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिका हद्दीसह मुंबई, बोरिवली, ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, दहिसर, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल, खोपोली, कर्जत, रसायनी आणि उरण भागात २४ सर्वसाधारण आणि ४६ वातानुकूलित अशा ७० बसमार्गावर प्रवासी सेवा देण्यात येत आहे. या बसमार्गांवर दररोज २ लाख २७ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. एनएमएमटीने महिला प्रवाशांना तिकिटामध्ये ५० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे या मार्गावर महिला प्रवाशांची संख्या लाखापार गेली आहे.
प्रवाशांचा प्रतिसाद वाढला
एनएमएमटी प्रशासनाने अटल सेतूमार्गे सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर दोन बसेस सुरू केल्या होत्या. या दोन्ही बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे महिलांसाठी विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. बसमार्ग क्रमांक ११६ ही नेरुळमधून खारकोपरमार्गे तर बस क्रमांक ११७ही खारघरमधून पळस्पे फाटामार्गे अटल सेतूवर जाणार आहे. या दोन्ही बसेसचा परतीचा प्रवास पुन्हा या मार्गावरून असणार आहे.