लासूर स्टेशन येथून जवळच असलेल्या लासूरगाव (ता. वैजापूर) येथील प्रसिद्ध देवी दाक्षायणी मातेचे मंदिर शिवना नदीकाठी वसलेले ऐतिहासिक गाव आहे. येथील देवी दाक्षायणी मातेच मंदिर हे राज्यभरातील भक्तांचे श्रद्धास्थान आहे. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची येथे दररोज नित्य गर्दी असते.
दरम्यान, यावर्षीही नवरात्र महोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू राहणार असून, नवरात्रोत्सवास आज गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. सकाळी 11 वाजेनंतर घटस्थापना करण्यात आली असून, देवी दाक्षायणीला अलंकार चढविण्यात आले. तर उद्या शुक्रवार, 4 रोजी सकाळी आठ वाजता सप्तशती पाठ होणार आहे. तर 11 ऑक्टोबरला होमहवन व पूर्णाहुती कार्यक्रम सकाळी 8 वाजता प्रारंभ होणार असून, दुपारी 12.30 वाजेपर्यंत चालणार आहे. तर शनिवार, 12 ऑक्टोबर विजयादशमीच्या दिवशी दिवसभर महाभिषेक, पानसुपारी, सीमोल्लंघन व सीमापूजन आदी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. त्यानंतर नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे. देवी दाक्षायणी नवसाला पावणारी आहे, अशी ख्याती असल्याने भाविकांची दर्शनाला मोठी गर्दी होत असते. लासूरगावचा उल्लेख काशीखंड पुराणात आढळतो. प्रजापती दक्ष राजाची दक्षनगरी म्हणून प्रसिद्ध होती. दक्ष राजाची कन्या दाक्षायणीने शिव शंकराशी विवाह व्हावा, यासाठी तपोव्रत केले. दक्ष राजाने दाक्षायणीचा विवाह शिवाशी करून दिला. दक्ष राजाने आयोजित केलेल्या यज्ञासाठी शिव-पार्वतीस बोलावले नाही; तरीही माहेरच्या ओढीने पार्वती भगवान शंकरास सोबत घेऊन आली; पण येथे उपेक्षा व पतीचा अवमान सहन न झाल्याने पार्वतीने यज्ञात उडी घेतली होती. त्यानंतर शंकराचे व दक्ष राजाचे प्रचंड युद्ध झाले. शंकराने दक्षाचा शिरच्छेद करून दक्षनगरी उलथवून टाकली होती. आजही लासूरगाव जवळ टेकडीसारखा काही भाग असून तो पालथीनगरी म्हणून ओळखला जातो. देवीच्या मंदिराचे बांधकाम पूर्वी हेमाडपंती होते, आता गावकऱ्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला असून, मंदिरासमोर एक दीपमाळ आहे. त्यावर कोरलेल्या वाघाच्या मूर्ती लक्ष वेधून घेतात. मंदिरावरील नक्षीकाम देखणे आणि सुंदर असून, देवीच्या मूर्तीसमोर वाघाची मूर्ती आहे. ही मूर्ती एका अखंड दगडी शिळेत कोरलेली आहे. बाजूला कासवाची मूर्तीही आहे. मुख्य कळस आणि तीन उप कळस असलेले, हे मंदिर गावाच्या प्रत्येक बाजूने नजरेस पडते. मंदिर परिसरात देवीला अर्पण करण्यासाठी साडी-चोळी, तेल, बेल-भंडारा, नारळ-फुले खेळणी, प्रसादाची विविध दुकाने थाटलेली आहेत. तसेच मंदिर परिसरात भक्तीसाधना केंद्र, भक्तनिवास, पाकगृह, मंगल कार्यालय भाविकांसाठी वाहनतळ आदी विविध विकासकामे केलेली आहेत.
वधू-वरांसाठी देवीच्या आशीर्वादाची प्रथा
भक्तांच्या नवसाला पावणारी देवी अशी आख्याखिका असल्याने भाविकांच्या गर्दीने हे मंदिर नेहमी फुललेले असते. गर्दीच्या काळात भाविकांच्या दर्शनासाठी विशेष सोय करण्यात येते. वर्षातून दोनवेळा लासूरगावात मोठा यात्रोत्सव असतो. नवरात्रोत्सवात दहा दिवस व चैत्र वैशाख महिन्यांत पंधरा दिवस मोठी यात्रा भरते. पंचक्रोशीतील नव वधू- बरासाठी दाक्षायणी देवीचा आशीर्वाद ही लग्न समारंभातलीच एक महत्त्वाची प्रथा आहे. त्यामुळे लासूरगाव तसेच परिसरातील वधू-वर देवीचा आशीर्वाद घेऊन सुखी संसाराला सुरुवात करतात, अशी माहिती देवस्थानचे व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे व सहायक व्यवस्थापक संतोष शेलार यांनी दिली.