कर्जाचा भार डोईजड झाला, नौदल अधिकारी सूरजकुमारची आत्महत्याच

शेअर बाजारात गुंतवण्यासाठी मित्र; नातेवाईकांकडून घेतलेले उसने पैसे, विविध बँकांचे लाखोंचे कर्ज, ते फेडण्यासाठी इतर बँकांकडे केलेली कर्जाऊ रकमेची मागणी अशा विवंचनेत अडकलेल्या नौदल अधिकारी सूरजकुमार दुबे याची हत्या झाली नसून कर्जाचा भार डोईजड झाल्यानेच त्याने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पालघर पोलिसांनी काढला आहे.

काही दिवसांपूर्वी दुबे याचा मृतदेह तलासरी येथील जंगलात जळालेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. दुबे यानेच पोलिसांना त्याला खंडणीसाठी तिघांनी डिझेल ओतून जाळल्याचे सांगितले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मात्र कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेल्या दुबे याने यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःचे जीवन संपवल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

तलासरी येथील वेवजीच्या वैजलपूर जंगलात 5 फेब्रुवारीला जळालेल्या अवस्थेत नौदल अधिकारी सूरजकुमार दुबे याला स्थानिकांनी पाहिले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी चेन्नई येथून खंडणीसाठी तिघांनी अपहरण करून मला वेवजीच्या जंगलात जाळल्याची माहिती दुबे याने पोलिसांना दिली.

मात्र मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तब्बल शंभर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दहा टीम तपास करू लागल्या. त्यानंतर ही माहिती समोर आली.

आपली प्रतिक्रिया द्या