एनसीबीच्या अधिकाऱयांची मुंबईत वसुलीसाठी प्रायव्हेट आर्मी कार्यरत; नवाब मलिक यांचा पुनरुच्चार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंबोली भागात एका भोजपुरी अभिनेत्रीला ड्रग्ज प्रकरणात अडकवून 40 लाख रुपयांची खंडणी वसूल करणाऱया दोघा तोतया एनसीबी अधिकाऱयांना पोलिसांनी अटक केली आहे. एनसीबीच्या या तोतयांनी ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवल्याने या अभिनेत्रीने आत्महत्या केली. त्यामुळे एनसीबीच्या अधिकाऱयांची प्रायव्हेट आर्मी मुंबईत असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी आज केला.

कार्डेलिया क्रूझ पार्टीवरील एनसीबीच्या छापेमारीमध्ये किरण गोसावी व मनीष भानुशालीला अटक झाली आहे. या दोघांनी आपण एनसीबीचे अधिकारी असल्याचा दिखावा केला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नवाब मलिक यांनी एनसीबीची प्रायव्हेट आर्मी असल्याचा आरोप केला होता. आता भोजपुरी अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या घटनेनंतर नवाब मलिक यांनी या आरोपाचा पुनरुच्चार केला आहे.

ओशिवरा पोलीस ठआण्याच्या हद्दीत 23 डिसेंबर रोजी एका भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाच्या तपासानंतर एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. सूरज परदेशी व प्रवीण वाळिंबे या दोघांनी आपण एनसीबीचे अधिकारी असल्याचे भासवून या अभिनेत्रीला पार्टीतून अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन  एनसीबीच्या या दोघा तोतया अधिकाऱयांनी या अभिनेत्रीकडे 40 लाख रुपयांची मागणी केली. पुढे 20 लाख रुपयांच्या रकमेवर तडजोड झाली, पण पैशाच्या मागणीला कंटाळून या अभिनेत्रीने आत्महत्या केली. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. या मुद्दय़ावरून नवाब मलिक यांनी एनसीबीवर पुन्हा एकदा निशाणा साधत एनसीबीच्या नावावर प्रायव्हेट आर्मी मुंबई खंडणी उकळण्याचे काम करीत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.