आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी धोरणात सुधारणा करणार, पालकमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा

1211

नक्षलवादाची हिंसक चळवळ सोडून मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या तसेच आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी धोरणात आवश्यक सुधारणा करण्यात येईल, अशी घोषणा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले.

नक्षलवादी चळवळ सोडून आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी सत्कार करण्यात आला. पालकमंत्री म्हणून पहिल्यांदाच ते गडचिरोली दौऱ्यावर आले होते. बिरजू ऊर्फ कृष्णा मासा दोरपेटी, जीवन ऊर्फ सुरेंद्र रामसाय नरोटे, रेणुका ऊर्फ जानकी फकरी तिम्मा आणि देवे ऊर्फ सुशीला दीनानाथ दुग्गा अशी या नक्षलवाद्यांची नावे आहेत. या सर्वांचे शिंदे यांनी स्वागत केले. अधिकाधिक नक्षलवाद्यांना प्रगतीची वाट दिसावी आणि आत्मसमर्पण करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचे योग्य पुनर्वसन होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले, तर नक्षलवादी म्हणून जगताना सतत भीतीच्या वातावरणात राहावे लागत होते. आता सुरक्षित आणि सन्मानाने जगत आहोत, अशी प्रतिक्रिया नक्षलवाद्यांनी दिली. या वेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. मोहित गर्ग आदी ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी शिंगदे यांनी गडचिरोलीतील रुग्णालयांनाही भेटी दिल्या. डॉक्टरांच्या अडचणी जाणून घेतल्या.

आपली प्रतिक्रिया द्या