
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे अनेक कारनामे दररोज उघडकीस येत आहेत. त्यात आता सायबर लुटारूची भर पडली आहे. तुषार वाजंत्री असे या लुटारूचे नाव असून त्याने अजित पवार गटात आपल्या कारनाम्याची ‘वाजंत्री’ आहे. या सायबर लुटारूने अनेक ज्येष्ठांना कोट्यवधी रुपयांना फसवले असून त्याचे रायगडात जुगाराचे क्लबदेखील आहेत. राजकीय वरदहस्तामुळेच त्याची दादागिरी सुरू होती. तुषारच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून त्याचे अनेक काळे धंदे आता उघडकीस येत आहेत.
तुषार वाजंत्री याने पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची 6 कोटी 29 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याचे राजकीय कनेक्शनही समोर आले आहे. विशेष म्हणजे पोलीस असल्याची बतावणी करून त्याने अनेकांची लूट केली. तुषारची पत्नी तेजस्विनी वाजंत्री ही रोहा तालुक्यातील कोकबन या गावची राष्ट्रवादी अजित पवार गटाची सरपंच आहे. तर वडील हरिश्चंद्र वाजंत्री हे रोहा तालुक्याचे उपाध्यक्ष असल्याची माहितीही उघडकीस आली आहे.
बड्या नेत्याचा वरदहस्त
कोकबन गावातील वाजंत्री कुटुंब हे अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचे निकटवर्तीय आहेत. त्याचा या कुटुंबाला वरदहस्त आहे. निवडणुकीच्या काळात या कुटुंबाने बड्या नेत्याला साथ दिली होती. मात्र आता या कुटुंबाच्या काळ्या बाजूचा पर्दाफाश झाल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात त्याची एकच चर्चा सुरू आहे. अजित पवारांच्या गटामध्ये कोणत्या प्रकारचे पदाधिकारी आहेत हे यानिमित्ताने दिसून आले आहे.
आणखी प्रकरणे चव्हाट्यावर येणार
रायगडातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे मिळालेले संरक्षक कवच, सरपंच पत्नी आणि स्वतःचे वडीलच राष्ट्रवादी पवार गटाचे तालुका उपाध्यक्ष असल्याने तुषार वाजंत्री याने रायगड जिल्ह्यात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. काळ्या पैशांच्या व्यवहारामध्ये डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची त्याने सहा कोटी रुपयांची फसवणूक केली. एवढेच नव्हे तर तुषारविरुद्ध विविध राज्यांमध्ये नॅशनल सायबर पोर्टलवर पाच तक्रारी दाखल आहेत. पुण्यातील प्रकरणाच्या निमित्ताने पोलिसांनी तुषारची ‘वाजंत्री’ वाजवली असून त्याची आणखी प्रकरणे चव्हाट्यावर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.