अधिक सक्रिय भूमिका घ्या, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बैठकीत अध्यक्ष सुनेत्रा पवारांना विनंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलीकडील वादांच्या मालिकेमुळे आणि पक्षातील अंतर्गत अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वरिष्ठ नेतृत्वाने पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अधिक “सक्रिय” भूमिका घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात तसेच सत्ताधारी आघाडीत स्वतःचे नेतृत्व ठळकपणे दाखवावे आणि निर्णयप्रक्रियेत अधिक ठोस हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा कोअर कमिटीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

सोमवारी झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवार यांनी केवळ औपचारिक नेतृत्व न करता प्रत्यक्ष राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे मत मांडले. विशेषतः 23 एप्रिल रोजी होणाऱ्या बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना अधिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. ही निवडणूक बिनविरोध पार पडावी, यासाठी विरोधी पक्षांशी संवाद साधून सर्वानुमते तोडगा काढण्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी, अशी पक्षाची भूमिका असल्याचे समोर आले आहे. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांसारख्या पक्षांशी थेट संपर्क साधून राजकीय समन्वय साधण्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

या सर्व घडामोडींमध्ये सुनेत्रा पवार यांनी भारतीय निवडणूक आयोगाला पाठवलेले पत्रच केंद्रस्थानी ठरले आहे. या पत्रात त्यांनी 28 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत पक्षाकडून झालेल्या कोणत्याही पत्रव्यवहाराचा विचार करू नये, अशी विनंती केली होती. हा कालावधी अजित पवार यांच्या निधनानंतर आणि स्वतःच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीपूर्वीचा होता. या पत्रामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद उघड झाल्याचे मानले जात असून, रोहित पवार यांनीही या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करत हा विषय चर्चेत आणला होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वशैलीबाबत काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. पक्षातील अनेक महत्त्वाचे निर्णय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या माध्यमातून घेतले जात असल्याची चर्चा रंगली आहे. तथापि, या दोन्ही नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना बाजूला करण्याचा कोणताही प्रयत्न नसल्याचे स्पष्ट करत, अजित पवार कुटुंबाप्रती आपली निष्ठा कायम असल्याचे सांगितले आहे.

बैठकीत सर्वानुमते असा निष्कर्ष नोंदवण्यात आला की, पक्षाच्या वाढीसाठी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक आहे आणि अंतर्गत मतभेदांचे चित्र बाहेर जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. पक्षामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन संवाद वाढवावा आणि राजकीय वाटाघाटींमध्ये थेट सहभाग घ्यावा, असेही स्पष्टपणे सांगण्यात आले.