
राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीमुळे काहीसे अस्वस्थ झालेले शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी बीड जिह्यातील पाच उमेदवारांची घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
संकटात सापडलेल्या पक्ष संघटनेला नवसंजीवनी देण्याबरोबरच राष्ट्रवादीची पडझड रोखण्यासाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरले असून मंगळवारपासून त्यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. बीड जिह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पवार यांनी राष्ट्रवादी आता नव्या लोकांच्या हातात देणार असल्याचे सांगत बुधवारी विधानसभेच्या संभाव्य उमेदवारांची घोषणा केला.
परळीत भाऊ विरुद्ध बहीण
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची उमेदवारी जाहीर केली असून परळी मतदारसंघात भाऊ विरुद्ध बहीण अशी लढत होणार आहे. तर राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेले आमदार जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांना बीड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. माजलगावमधून माजी मंत्री प्रकाश सोळुंके, गेवराईमधून विजयसिंह पंडित, केजमधून नमिता मुंदडा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.




























































