शरद पवार मैदानात, मंगळवारपासून राज्याच्या दौऱयावर

998
शरद पवार – 1) 18 जुलै, 1978 ते 17 फेब्रुवारी, 1980 (पुलोद), 2) 26 जून, 1988 ते 25 जून 1991 (काँग्रेस), 3) 6 मार्च, 1993 ते 14 मार्च, 1995 (काँग्रेस)

राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबण्याचे नाव नाही. यामुळे संकटात सापडलेल्या पक्ष संघटनेला नवसंजीवनी देण्याबरोबरच राष्ट्रवादीची पडझड रोखण्यासाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरणार आहेत. मंगळवारपासून ते राज्याच्या दौऱयावर निघणार असून सोलापूर येथून त्याची सुरुवात होणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पक्षाला रामराम करत सत्ताधारी पक्षात सामील होत आहेत. याची गंभीर दखल घेत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी गेल्याच आठवडय़ात झालेल्या पक्षांतर्गत बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अधिक पडझड होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही एकामागून एक आमदार, खासदार पक्ष सोडून जात आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष सोडून जाणारे नेते व पदाधिकाऱयांना थोपवणे व पक्षात असलेल्यांना विश्वास देण्यासाठी पवार स्वतः राज्याचा दौरा करणार आहेत.

पहिल्या टप्प्यात सोलापूर, धाराशीव, बीड, साताऱयाचा समावेश
मंगळवार, 17 सप्टेंबरपासून शरद पवार राज्यव्यापी दौऱयाची सुरुवात करणार आहेत. पहिल्या टप्प्यात ते ज्या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील दिग्गज नेते सोडून गेले अशा सोलापूर, धाराशीव, बीड, सातारा, नगर, लातूर, हिंगोली, परभणी आदी जिह्यांचा समावेश आहे. या दौऱयात ते विधानसभेचे उमेदवार, पक्षाचे नेते, पदाधिकारी यांच्याशी प्रामुख्याने संवाद साधणार आहेत.

भाजपला धक्का; माजी आमदार घोडमारे राष्ट्रवादीत
निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील दिग्गज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. हे एकीकडे सुरू असताना राष्ट्रवादीनेही भाजपला झटका दिला आहे. नागपूरमधील हिंगणा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी शनिवारी शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला.

आपली प्रतिक्रिया द्या