
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार जसजसा शिगेला पोहोचत आहे, तसतसा राजकीय गुन्हेगारीला उैत आल्याचे दिसून येत आहे. बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर बुधवारी मध्यरात्री अहिल्यानगर–सोलापूर महामार्गावरील मांदळी गावाजवळ दहा ते पंधराजणांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात खाडे यांच्यासोबत असलेले सहकारीही जखमी झाले असून, त्यांच्यावर अहिल्यानगरमध्ये उपचार सुरू आहेत.
आष्टी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर मध्यरात्री दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने हल्ला केला. या टोळक्याने त्यांची इनोव्हा गाडी अडवून खाडे यांना बाहेर खेचून बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या सहकाऱयांवरही हल्ला केला. हल्लेखोरांनी खाडे यांच्या गाडीचेही मोठे नुकसान केले. गंभीर अवस्थेत खाडे यांना अहिल्यानगर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, खाडे यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुण्याला हलवण्यात आले आहे. या घटनेने आष्टी तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.
राम खाडे यांच्यावरचा हा तिसरा हल्ला आहे. न्यायालयाने खाडे यांना शस्त्र परवाना दिला होता. मात्र, पोलीस प्रशासनाने अलीकडेच शस्त्र परवाना रद्द केला होता. त्यांना दिलेले पोलीस संरक्षणही काढून घेतले होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते शिवराज बांगर यांनी, हा हल्ला कुणाच्या इशाऱ्यावरून झाला, हे जिल्हय़ाला माहिती असल्याचे सांगून अप्रत्यक्षरीत्या आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला.





























































