लोकसभा निवडणुकीत आपल्याला ठेच लागली आहे. इंडिया आघाडीची गाडी पुढे गेली आहे. आता विधानसभा निवडणुका आहेत. त्यासाठी जागा वाटपाचा निपटारा लवकर केला पाहिजे. आमचे 40-45 आमदार आहेत. शिंदेंचेही तेवढेच आहेत. त्यामुळे शिंदेंना जेवढय़ा जागा मिळतील तेवढय़ाच जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार छगन भुजबळ यांनी सोमवारी केली, मात्र जागा वाटपावर मंत्र्यांनी आणि इतर कुणी काही बोलू नका असा दम या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील विसंवाद दिसून आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) 25 व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातच जागा वाटपावरून अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बेबनाव व मतभिन्नता दिसून आली.
सुनील तटकरे काय म्हणाले,
लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला केवळ चार जागा मिळाल्या. विधानसभा निवडणुकीत काय होईल अशी चर्चा आहे, पण जागा वाटपावर मंत्र्यांनी आणि इतर कुणी काही बोलू नका. तुम्ही बोललात की मित्रपक्षाचे प्रवक्ते बोलतात आणि मग महायुतीत वातावरण कलुषित होते.
प्रफुल्ल पटेल काय म्हणाले,
आज आपण 60 च्या घरात आहोत. आपल्याला त्यापुढे 20 ते 30 मतदारसंघ शोधायचे आहेत. लोक राग एकावेळीच काढतात. यावेळी जिल्हा परिषद, महापालिका कुठल्याच निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे लोकांना राग काढायचा होता तो या निवडणुकीत काढला.
भुजबळ काय म्हणाले…
मागच्या वेळी मी बोललो लोकसभेसाठी 80 जागा कमीत कमी मिळाल्या पाहिजेत, पण लगेच माझ्याविरोधात बोलायला लागले. असे काही बोलायचे नाही असे त्यावर मला सांगितले. पण जोपर्यंत जागा वाटपाचे गुऱहाळ चालणार नाही तोपर्यंत तुमचा फायदा होणार नाही. त्यामुळे त्याचा लवकर निपटारा केला पाहिजे, सीट वाढवून पाहिजेत. भाजप हा मोठा भाऊ आहे. त्यांनी सांगितले मान्य आहे, पण आम्हीसुद्धा सांगितले होते आमचे 40-45 आमदार आहेत. शिंदेंचेसुद्धा आहेत, पण त्यांना जेवढे मिळणार तेवढे आम्हालाही जागा मिळायला पाहिजेत. शिंदेंचे खासदार जास्त आले ते जास्त जागा घेतील अशी भीती यावेळी भुजबळ यांनी व्यक्त केली.