
देशाच्या पंतप्रधानपदी निवडून आल्यानंतर राज्यांना मदत करणे ही नरेंद्र मोदी यांची नैतिक जबाबदारी आहे, पण प्रत्यक्षात पंतप्रधान सदासर्वकाळ फक्त महाराष्ट्रावरच टीका करतात. ही वेदना देणारी बाब असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केले.
पंतप्रधानपदावरील व्यक्तीने चांगली वागणूक देणे हे सर्वसामान्यांना अपेक्षित आहे, पण त्याऐवजी नरेंद्र मोदी हे राजकारणी म्हणून नेहमी वावरतात, असेही टीकास्त्र त्यांनी सोडले.
पालघरच्या दौऱ्यावर आलेल्या सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारच्या महाराष्ट्रद्वेष्ट्या धोरणाचा जोरदार समाचार घेतला. त्या म्हणाल्या, कोरोनाच्या स्थितीवर राज्यांसोबत चर्चा करून पंतप्रधानांनी मार्गदर्शन करावे असे अपेक्षित होते, पण त्यांनी सर्वच गोष्टी राज्यांवर ढकलल्या. दारूवरील कर कमी करून दारू स्वस्त करण्यापेक्षा पेट्रोलवरील कर कमी करा, अशी खोचक टीका पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली होती.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पेट्रोलियम मंत्र्यांच्या या वक्तव्याचाही चांगलाच समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, हरदीपसिंग पुरी यांची सूचना चांगली आहे. मात्र आजचा पेट्रोल-डिझेलवरील जो कर आहे, त्यातील सर्वात जास्त वाटा हा केंद्र सरकारचा आहे. डेटादेखील हेच सांगतो. पेट्रोलियम मंत्री हे वरिष्ठ व अनुभवी आहेत. या विषयाबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट जर त्यांनी पाहिले तर जास्त व्यापक व चांगली चर्चा करता येईल असेही त्यांनी सुनावले.
राष्ट्रवादीबद्दल भाजपला प्रेम… आनंदच आहे
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपने राष्ट्रवादीसोबत जायला हवे होते असे वक्तव्य केले होते. त्यावर भाष्य करताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, एखादा माणूस जर हे कबूल करतो तर तो त्याचा मोठेपणा म्हणावा लागेल. यानिमित्ताने राष्ट्रवादीबद्दल भाजपला जे प्रेम येऊ लागले आहे त्याचा मला आनंद आहे.





























































