
सामना प्रतिनिधी । डोंबिवली
अंहिसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोरच बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करून धरणे आंदोलनात केवळ फोटोत चमकण्यासाठी पहिल्या रांगेत बसण्यावरून हा राडा झाला.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त डोंबिवलीतील पु. भा. भावे सभागृहासमोरील उद्यानात महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर धरणे आंदोलन करण्यासाठी पदाधिकारी एकत्र आले. मात्र त्यावेळी आपला फोटो झळकावा म्हणून सर्वात पुढे कोण बसणार यावरून माजी जिल्हा कार्याध्यक्ष विलास म्हात्रे आणि माजी शहर कार्याध्यक्ष राजेंद्र नांदोस्कर यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने वाद तुंबळ हाणामारीपर्यंत गेला. अचानक उद्भवलेल्या राड्यामुळे कार्यकर्त्यांची मात्र पळापळ झाली.


































































