जिल्हाध्यक्षाच्या नियुक्त्यांवरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajit-pawar-tension

सामना प्रतिनिधी । मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांवरून कार्यकर्त्यांमध्ये उसळलेला संताप आता रस्त्यावर आला आहे. दक्षिण मुंबईतील नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या विरोधात संतप्त कार्यकर्त्यांनी आज बेलॉर्ड पीयर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. संतप्त कार्यकर्त्यांचा रुद्रावतार पाहून अजित पवार तर पक्ष कार्यालयात फिरकलेच नाहीत.

आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या सुरू झाल्या आहेत. यापूर्वी पूर्व उपनगरात संजय पाटील व पश्चिम उपनगरात अजित रावराणे यांची नियुक्ती करण्यात आली. उर्वरित चार जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. पण दोन दिवसांपूर्वी घाईघाईत दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षपदी विजय वाडकर यांची नियुक्ती करण्यात आली. वाडकर यांची नियुक्ती रद्द करण्याच्या मागणीसाठी दुपारी दक्षिण मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी बेलॉर्ड पीयर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांची गटागटाने भेट घेतली. दक्षिण मुंबईतल्या मुंबादेवी, मलबार हिलमधील कार्यकर्त्यांच्या तक्रारी या जयंत पाटील यांनी ऐकून घेतल्या.