ऑलिम्पिक तयारीसाठी नीरज चोप्राचा दक्षिण आफ्रिकेत सराव सुरू

दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता हिंदुस्थानचा भालाफेक सुपरस्टार नीरज चोप्राने 2026 च्या  क्रीडा हंगामासाठी सत्रपूर्व सरावाला अधिकृत सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेतील पोटचेफस्टम येथे सुरू असलेल्या 32 दिवसांच्या विशेष प्रशिक्षण शिबिराला क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेलची मंजुरी मिळाली आहे. या नव्या पर्वात नीरज आपल्या मूळ प्रशिक्षक जय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार आहे. जय चौधरी हे नीरजचे सुरुवातीचे प्रशिक्षक असून ते पानिपत येथे युवा भालाफेकपटूंना घडवत आहेत. हिंदुस्थानी क्रीडा प्राधिकरणाच्या सूत्रांनुसार, नीरज 5 फेब्रुवारीपर्यंत पोटचेफस्टममध्ये तळ ठोकणार असून या शिबिरासाठी 11 लाख 80 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. या रकमेत प्रशिक्षण शिबिराचा खर्च, जिम व सराव मैदानाची सुविधा, प्रवास आणि वैयक्तिक खर्चाचा समावेश आहे. या काळात नीरजसोबत त्यांचे दीर्घकाळचे फिजिओथेरपिस्ट इशान मारवाहादेखील उपस्थित असतील.