NEP vs WI – नेपाळनं इतिहास रचला, दोन वेळच्या वर्ल्डकप विजेत्या वेस्ट इंडिजला पराभवाचा धक्का दिला

नवख्या नेपाळ संघाने टी-20 लढतीत दोन वेळच्या वर्ल्डकप विजेत्या वेस्ट इंडिजचा पराभव करत इतिहास रचला आहे. नेपाळने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 148 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना विंडिजचा संघ 129 धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि नेपाळने 19 धावांनी विजय मिळवला. शारजाहमध्ये हा सामना खेळला गेला.

वेस्ट इंडिजचा कर्णधार अकील हुसैन याने नाणेफेक जिंकून नेपाळला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कर्णधार रोहित पोडेल याच्या 38, कुशल मल्ला याच्या 30 आणि गुलशन झा याच्या 22 धावांच्या बळावर नेपाळने 20 षटकात 8 बदा 148 धावा करत वेस्ट इंडिजला विजयासाठी 149 धावांचे आव्हान दिले. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर नवीन बिदैसी याने 3 विकेट्स घेतल्या.

माफक धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवातच खराब झाली. काईल मेयर्स दुसऱ्याच षटकात 5 धावा काढून बाद झाला. त्यानंतर विंडिजचे फलंदाज एकामागोमाग एक बाद झाले आणि 12.2 षटकात विंडिजची अवस्था 5 बहाद 68 अशी बिकट झाली. त्यानंतरही नेपाळच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत विंडिजच्या फलंदाजांना बांधून ठेवले.

अखेरच्या षटकामध्ये विंडिजचा 28 धावांची गरज होती. मात्र विंडिजचा संघ या धावा करण्यात अपयशी ठरला आणि नेपाळने 19 धावांनी विजय मिळवला. नेफाळकडून कुशल भुर्थल याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.