माऊंट एव्हरेस्टसाठी मोजा लाखो रुपये

माऊंट एव्हरेस्ट म्हणजे जगातील सर्वोच्च शिखर. या शिखरावर चढाई करण्यासाठी दरवर्षी जगभरातून हजारो गिर्यारोहक येतात. यापुढे एव्हरेस्ट चढण्यासाठी जास्त रक्कम द्यावी लागणार आहे. नेपाळ सरकारने एव्हरेस्ट चढण्यासाठी लागणाऱ्या परवान्यांचे शुल्क वाढवले आहे. विदेशी गिर्यारोहकांना एव्हरेस्ट चढण्यासाठीचे शुल्क 11 हजार  अमेरिकन डॉलरवरून 15 हजार अमेरिकन डॉलर करण्यात आले आहे.

देशी चलनात सांगायचे तर 9.48 लाख रुपयांवरून 12.35 लाख रुपये शुल्क वाढ करण्यात आली. माऊंट एव्हरेस्ट चढण्याचे दर ऋतूनुसार बदलतात. सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान गिर्यारोहण शुल्कात सुमारे 1 लाख 60 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली. डिसेंबर ते फेब्रुवारी आणि जून ते ऑगस्टदरम्यान फीमध्ये 80 हजार रुपयांची वाढ करण्यात आली. नेपाळी गिर्यारोहकांच्या परमिट शुल्कातदेखील वाढ होत आहे. शरद ऋतूत एव्हरेस्टवर चढाई करू इच्छिणाऱ्या गिर्यारोहकांना 75 हजार रुपयांऐवजी दीड लाख रुपये मोजावे लागतील.