
क्रिकेटच्या पंढरीत प्रथमच खेळत असलेल्या नवख्या नेपाळने इंग्लिश संघाला अक्षरशः हादरवले. आपल्या घरातच खेळत असल्यासारखा भन्नाट खेळ करणारा नेपाळ इंग्लंडला हरवतो की काय असे वाटत असताना इंग्लंडने अवघ्या चार धावांनी बाजी मारली. इंग्लंडच्या 185 धावांचा पाठलाग करताना नेपाळ अवघ्या एका फटक्याने आपल्या क्रीडा इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवण्यापासून दूर राहिला. शेवटच्या 21 चेंडूंमध्ये 54 धावा हव्या असताना लोकश बामने मैदान पेटवले. त्याच्या तुफानी फलंदाजीने 18 चेंडूंत 44 धावा चोपून काढत सामना फिरवला. पण सॅम करनच्या थंड डोक्याच्या अखेरच्या षटकाने इंग्लंडला जीवदान दिले. 6 चेंडूंत फक्त 5 धावाच काढता आल्या आणि नेपाळ इतिहास घडवता घडवता राहिला. सामना इंग्लंडने जिंकला तरी आज वानखेडेवर नेपाळने मने जिंकली.
पुन्हा पराभवाच्या वेदना
नेपाळसाठी ही वेदनादायी पुनरावृत्ती ठरली. 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका धावेने पराभव, आता एका फटक्याने. तरीही त्यांनी इंग्लंडला अक्षरशः घाम फोडला. आज नेपाळ जिंकला असता तर वर्ल्ड कपच्या दुसऱयाच दिवशी सनसनाटी निर्माण झाली असती. पण आज नेपाळचा खेळ पाहून हा संघ वर्ल्ड कपची मजा आणि थरार वाढवणार, हे संकेत मिळाले आहेत.
जेकब बेथेल (55) आणि हॅरी ब्रूक (53) यांच्या अर्धशतकांमुळे उभ्या राहिलेल्या आव्हानाला नेपाळने सुरुवातीपासूनच भिडण्याचा पवित्रा घेतला. कुशल भुरतेलने जोफ्रा आर्चरवर चार चेंडूंमध्ये तीन चौकार ठोकत इंग्लंडला पहिल्याच षटकात इशारा दिला की आम्ही केवळ हजेरी लावायला नाही आलोय. त्यानंतर दीपेंद्र सिंग ऐरी आणि रोहित पौडेल यांनी 54 चेंडूंमध्ये 82 धावांची देखणी भागीदारी रचली.






























































