आबालवृद्धांची आवडती असणारी नेरळ-माथेरान मिनी ट्रेन 15 ऑक्टोबरपर्यंत सुरू होणार होती. मात्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने ट्रेन चालवण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे 25 ऑक्टोबरचा मुहूर्त हुकला असून पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. झुक झुक गाडीत बसण्यासाठी पर्यटकांना आणखी काही दिवस तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरवर्षी पावसाळी चार महिने नेरळ-माथेरान मिनी ट्रेन बंद असते. यावर्षी 8 जूनपासून मिनी ट्रेन पावसाळी सुट्टीवर गेली होती. 15 ऑक्टोबरपर्यंत बंद असणार असे रेल्वेने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले होते. पावसाळी हंगाम संपला असला तरी ऑक्टोबर सुरू होताच परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. माथेरान घाटात पावसाची रिपरिप कायम असून दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरक्षेचे कारण पुढे करत रेल्वेने 15 ऑक्टोबरला सुरू होणारी ट्रेनसेवा पुढे ढकलली आहे. त्यामुळे पर्यटकांना आणखी काही दिवस मिनी ट्रेन सुरू होण्याची वाट पाहावी लागणार आहे.
वाफेवर चालणाऱ्या इंजिनाची चाचणी
अमन लॉज-माथेरान शटल सेवा नियोजित वेळेनुसार सुरू आहे. नेरळ-माथेरान या 21 किलोमीटर अंतरावर मालवाहू मिनी ट्रेनची फेरी सुरू असून मध्य रेल्वेकडून प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी मिनी ट्रेन मार्गाची पाहणी केली जात आहे. याशिवाय 1917 मध्ये ब्रिटिशकाळात बनविण्यात आलेले वाफेचे इंजिन सुस्थितीत आहे की नाही हे पाहण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नेरळ स्थानकात वाफेवर चालणाऱ्या इंजिनाची चाचणी घेतली.