नवी मुंबईत शुश्रूषा रुग्णालयाला आग; 21 रुग्ण बचावले, कर्मचाऱ्यांनी रुग्णांना तातडीने बाहेर काढले

हृदयविकारावर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नेरुळ येथील सेक्टर 6 मधील शुश्रूषा रुग्णालयाला सोमवारी सकाळी अचानक आग लागली. त्यावेळी रुग्णालयात 21 रुग्ण उपचार घेत होते. रुग्णालयातील सुमारे 42 कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत या सर्वच रुग्णांना तातडीने रुग्णालयाबाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि या आगीवर नियंत्रण मिळवले. शुश्रूषा रुग्णालयाला लागलेल्या आगीमुळे रुग्णांच्या नातेवाईकांची मात्र पळापळ उडाली.

शुश्रूषा रुग्णालयाच्या तळघरात वातानुकूलित यंत्रणा ठेवण्यात आली आहे. या यंत्रणेमध्ये आज सकाळी 11 च्या सुमारास शॉर्टसर्किट झाले आणि मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ उठले. हा धूर पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत पसरल्यानंतर रुग्ण आणि कर्मचाऱ्यांची एकच पळापळ उडाली. रुग्णालयात 21 रुग्ण उपचार घेत होते. या सर्व रुग्णांना रुग्णालयातील 42 कर्मचाऱ्यांनी तातडीने बाहेर काढले आणि शेजारी असलेल्या एका इमारतीत ठेवले.

आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ही आग आटोक्यात आणली. आगीमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे, असे अग्निशमन अधिकारी गजेंद्र सुसविरकर यांनी सांगितले.

रुग्णांना हलवले

शुश्रूषा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्वच रुग्णांना आता अन्य ठिकाणी हलवण्यात आले आहे. २० रुग्णांना याच रुग्णालयाच्या पनवेल येथील शाखेत पाठवण्यात आले असून एका रुग्णाला वाशी येथील फोर्टिस रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले आहे. रुग्णालयाला आग लागल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी आणि परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.