
दीर्घ प्रतीक्षेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर लवकरच नव्या एसी लोकल ट्रेन दाखल होणार आहेत. दोन्ही मार्गांवर आकर्षक आणि अद्ययावत रचनेच्या प्रत्येकी एका एसी लोकलची भर पडणार आहे. नव्या एसी लोकलमध्ये अतिरिक्त आसनक्षमता तसेच प्रवाशांना उभे राहण्यासाठी अधिक जागा असणार आहे. त्यामुळे ‘पीक अवर्स’च्या गर्दीमध्ये प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवीन एसी लोकल ट्रेन चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून(आयसीएफ) मुंबईत आणल्या जाणार आहेत. सध्या उपनगरी रेल्वे मार्गावर एसी लोकल ट्रेन पूर्ण क्षमतेने प्रवासी सेवेत धावत आहेत. कोणतीही अतिरिक्त ट्रेन उपलब्ध नसल्यामुळे एखाद्या गाडीत बिघाड झाला तरी संपूर्ण वेळापत्रकावर त्याचा परिणाम होतो. याच पार्श्वभूमीवर नवीन एसी लोकलची अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेसाठी चेन्नईतून नवीन ‘अंडरस्लंग’ मेधा एसी लोकल येणार आहे. ती ट्रेन सध्या विल्लिवाक्कम यार्डमध्ये उभी आहे. ‘अंडरस्लंग’ ट्रेनमध्ये विद्युत प्रणालीसारखी प्रमुख उपकरणे कोचच्या आत ठेवण्याऐवजी कोचच्या मजल्याखाली ठेवली जातात. त्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यासाठी अधिक मोकळी जागा मिळते आणि अतिरिक्त आसनक्षमता उपलब्ध होते. नव्या रचनेच्या एसी लोकलमध्ये प्रवाशांची आसनक्षमता 1028 वरून 1116 पर्यंत वाढेल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.
दररोज 10 ते 12 फेऱ्या वाढणार
सद्यस्थितीत पश्चिम रेल्वे प्रशासन 10 एसी लोकल ट्रेनचा वापर करून 109 एसी लोकल फेऱया चालवत आहे, तर मध्य रेल्वे 7 एसी ट्रेनच्या सहाय्याने 90 एसी लोकल फेऱया चालवते. दोन्ही मार्गांवर प्रत्येकी एक एसी लोकल सेवेत दाखल झाल्यानंतर दररोज 10 ते 12 एसी लोकल फेऱया वाढणार आहेत. मध्य रेल्वेमार्गावर दोन आठवडय़ांत नवीन रचनेची एसी लोकल येण्याची शक्यता आहे.



























































