बेस्ट बसप्रमाणे एसटीचा ठावठिकाणा कळणार

एसटी प्रवास करणाऱया प्रवाशांना आता आपली बस कुठे आली, याचा ठावठिकाणा कळणार आहे. बेस्ट बसेसप्रमाणे एसटीचे लोकेशन समजणार असून त्यासाठी ‘आपली एसटी’ हे नवीन अॅप प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आले आहे. दसऱयाच्या मुहूर्तावर या अॅपचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे प्रवाशांना आता एसटी थांब्यावर ताटकळत उभे रहावे लागणार नाही. 12 हजारपेक्षा जास्त बसेस आणि राज्यभरातील 1 लाखपेक्षा जास्त मार्गाचे मॅपिंग करून हे अॅप विकसित करण्यात आले आहे. भविष्यात लाखो प्रवासी याचा वापर करणार असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्यास प्रवाशांनी त्याबाबत सूचना कराव्यात. प्रवाशांच्या सूचनांमुळे एक परिपूर्ण अॅप विकसित करण्यास मदत होईल, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. या अॅपमुळे प्रवाशांना आपल्या जवळच्या बसस्थानकाची माहिती मिळेल. प्रवासी माहिती केंद्राद्वारे बस कुठून सुटणार आणि ती बस थांब्यावर केव्हा पोहोचणार याची माहिती मिळणार आहे.