
पालघर, वसई, ठाणे नवी मुंबई रायगड सर्व ठिकाणी रॉयल्टीची चोरी होते. रात्री बारानंतर राजरोजपणे गौण खनिज काढले जाते. गौण खनिजमाफिया प्रशासनाला जुमानत नाहीत.
गौण खनिजावरील कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी माफियांच्या खिशात जाते, अशा शब्दांत शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत हल्लाबोल केला. त्यावर अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नवीन नियमावली लवकरच येईल, अशी महत्त्वाची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
वसई विरार पूर्वेकडील शिरगाव रायपडा येथील दगडखाणीत बेकायदा पद्धतीने स्फोट घडवून उत्खनन केल्याप्रकरणी महसूल विभागाकडे तक्रार करणारे सामाजिक कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याच्या संदर्भात सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.




























































