
अहिल्यानगर शहराचे नवे महापौर व उपमहापौर 31 जानेवारीपर्यंत निवडले जातील, अशी शक्यता असतानाच आता ही निवड लांबणीवर पडली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात या निवडी होण्याची शक्यता आहे. नाशिक विभागातील महापौर व उपमहापौरांच्या निवडी 6 फेब्रुवारीला होणार आहेत. जिल्हाधिकारी पंकज आशिया हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
महापौर व उपमहापौर निवडीसंदर्भातील कार्यक्रम नाशिक विभागीय आयुक्तांकडून मंगळवारी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे. महापालिकेसाठी 15 जानेवारीला निवडणूक झाली. त्यानंतर नगरविकास खात्यामार्फत मुंबईत महापौरपदासाठी आरक्षण काढण्यात आले. त्यानुसार महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर 30 किंवा 31 जानेवारीला महापौर व उपमहापौरांची निवड प्रक्रिया राबविण्याची सूचना शासनाने केली होती. दरम्यानच्या काळात महापालिका प्रशासनाकडून महापौर निवडीबाबतचा प्रस्ताव नाशिक विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या सूचनेप्रमाणे 30 व 31 जानेवारीला महापौर व उपमहापौर निवडीची प्रक्रिया होऊ शकते, अशी शक्यता होती; परंतु आता या निवडी लांबणीवर पडल्या असून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात होणे अपेक्षित आहे. महापौरपदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
ओबीसी महिला या राखीव प्रवर्ग जागेतून 9 महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत.
नामनिर्देशन पत्रासाठी 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान मुदत
n महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर व उपमहापौर पदांसाठी येत्या 6 फेब्रुवारीला विशेष सभेत निवडणूक होणार आहे. विभागीय आयुक्तांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची पीठासन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 3 ते 6 फेब्रुवारीदरम्यान कार्यालयीन वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता होणाऱया विशेष सभेत आधी महापौर पदासाठी व नंतर उपमहापौर पदासाठी निवडणूक होईल.

























































