
तब्बल दोनशे वर्षांचा इतिहास संशोधनाचा वारसा असलेल्या ‘दि एशियाटिक सोसायटी’ या प्रतिष्ठत संस्थेची निवडणूक येत्या 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी 27 सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभेत मान्य झालेल्या आणि 3 ऑक्टोबरपर्यंत छाननी झालेल्या नव्या सभासदांना मतदान करता येणार आहे. तसे निर्देश आज धर्मादाय उपायुक्तांनी दिले.
एशियाटिक सोसायटीकडे एरव्ही दर महिन्याला 20 ते 25 नवे अर्ज येतात, मात्र निवडणुकीचे बिगुल वाजताच मोठय़ा प्रमाणात, एकगठ्ठा अर्ज सदस्य नोंदणीचे अर्ज झाले. मार्चनंतर 1800 नवीन सभासदांची भर पडली आहे. संस्थेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सभासद नोंदणीचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप प्रत्यारोप झाला. अशातच सभासद संख्या विशिष्ट हेतू डोळ्य़ासमोर ठेवून नोंदवल्याबाबत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तीन तक्रारी दाखल झाल्या. याबाबतची सुनावणी आज धर्मादाय उपायुक्त राम लिप्टे यांच्यासमोर झाली. उपायुक्त लिप्टे यांनी 27 सप्टेंबर रोजी एजीएममध्ये मंजूर झालेले आणि 3 ऑक्टोबरपर्यंत छाननी झालेल्या मतदारांची यादी तयार करण्याचे आणि त्यानुसार निवडणूक घेण्याचे आदेश दिले.
संस्थेचे सुमारे 3500 सभासद होते. ते मतदानात भाग घेतील. त्यात आता 27 सप्टेंबरपर्यंतच्या 355 नव्या सभासदांची भर पडली आहे.
एशियाटिकच्या निवडणुकीत 19 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात आहेत. अध्यक्षपदासाठी कुमार केतकर आणि विनय सहस्रबुद्धे यांच्यात दुरंगी लढत आहे. उपाध्यक्ष पदाच्या जागा चार असून त्यासाठी 14 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये ए.डी. सावंत, अर्जुन डांगळे, दीपक पवार, रमेश पतंगे, संजय देशमुख आदी आहे. व्यवस्थापकीय समितीच्या सहा जागा आहेत. त्यामध्ये इब्राहिम अफगाण, पुंदा नीळपंठ, माधव भंडारी, सुनंदा भोसेकर अशी 16 मंडळी निवडणुकीच्या मैदानात आहेत.































































