
देशातील आगळावेगळा आणि नवा ओटीटी प्लॅटफॉर्म असलेला बझफ्लिक्स (Buzzflix) प्रेक्षकांच्या सेवेत रुजू झाला आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मचे वैशिष्ट्य म्हणजे यावरील मालिका, चित्रपट हे संपूर्ण कुटुंबासह पाहता येतील. या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टी तसंच मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकारांची उपस्थिती होती.
#sabkaott या हॅशटॅग अंतर्गत या ओटीटी प्लॅटफॉर्म रसिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट तसेच मालिका कुटुंबासह पाहता येतील, हे याचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हा ओटीटी प्लॅटफॉर्म इतर प्लॅटफॉर्मपेक्षा वेगळा असणार आहे. अश्लीलता, हिंस्र , उत्तान बाबी बझफ्लिक्सवर दाखवल्या जाणार नाहीत.
बझफ्लिक्सचे संस्थापक समीर शेनॉय, सहसंस्थापक राकेश ठाकूर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवरसेन येसंबरे यांनी या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत सांगितले की, बझफ्लिक्सवरील चित्रपट आणि वेब सिरीजचा आनंद कुटुंबासह लुटता येईल. सध्याच्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या यादीत एकही प्लॅटफॉर्म असा नाही, ज्यावरील मालिका किंवा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह आपण घरी बसून पाहू शकतो. आम्ही इतरांशी स्पर्धा करू इच्छित नाही, मात्र प्रेक्षकांना एक चांगला पर्याय म्हणून बझफ्लिक्सवर वैविध्यपूर्ण आणि चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. या प्लॅटफॉर्मवरील कंटेंट हा सध्या हिंदी भाषेत असून लवकरच इतर प्रादेशिक भाषांत डब केला जाणार आहे. प्रादेशिक भाषेतील कंटेंट वाढवण्यावर या पुढील काळात भर दिला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.























































