
सामना ऑनलाईन, मुंबई
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून रोज पैसे काढण्याची मर्यादा निम्म्याने कमी केली आहे. यामुळे ग्राहकांना स्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त 20 हजार रुपयेच काढता येतील. पूर्वी ही मर्यादा 40 हजार रुपयांपर्यंत होती. याची अंमलबजावणी येत्या 31 ऑक्टोबरपासून होणार आहे.
एटीएमच्या व्यवहारात फसवणूक होण्याचे वाढलेले प्रमाण आणि डिजिटल कॅशलेस ट्रन्जॅक्शनला उत्तेजन देण्यासाठी एटीएममधून रोकड काढण्याची मर्यादा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्टेट बँकेने म्हटले आहे.
डिजिटल टॅन्जॅक्शनला सरकारकडून प्रोत्साहन दिलेले आहे. तरीही रोख रकमेची मागणी वाढली आहे. नोटाबंदीच्या अगोदर बाजारात रोख रक्कम जेवढी होती, तेवढय़ा प्रमाणात सध्या रोख रक्कम बाजारात आलेली आहे, असा एक अंदाज आहे.
एटीएममधून मोठय़ा प्रमाणात छोटय़ा स्वरूपातच रक्कम काढली जाते. जास्तीत जास्त ग्राहकांसाठी 20 हजारांची रक्कम भरपूर आहे, असे आमच्या अंतर्गत पाहणी विश्लेषणातून समोर आले आहे, असे स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. गुप्ता यांनी सांगितले. छोटी विथड्रॉअल, छोटी रक्कम काडताना फ्रॉड, फसवणूक होऊ नये यासाठीही आमच्या प्रयत्न सुरू आहे, असेही ते म्हणाले.
डेबिट कार्ड युजर्सची जास्त फसवणूक
फसवणुकीच्या टप्प्यात डेबिट कार्ड युजर्स जास्त येतात, असे पेमेंट टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीच्या व्यक्तीने सांगितले. पीनची माहिती एटीएमवरच फक्त चोरली जात नाही तर ती दुकाने, मॉल येथे असलेल्या पॉइंट ऑफ सेल टर्मिनल्सही (पीओएस मशिन) चोरली जाते, असेही त्यांनी सांगितले. मोबाईल कार्ड स्वाइप डिव्हाइसचा वापर करणारेही यात फसवणूक करतात, असेही त्यांनी निदर्शनास आणले.



























































