
नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एन्जॉय करण्यासाठी लाखोंची गर्दी मुंबईबाहेर रवाना झाली आहे. आजपासून सुरू झालेल्या सलग सुट्टय़ांनी त्यात भर घातली आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच वाहनांनी सर्व महामार्ग जॅम झाले आहेत. टोलनाक्यांवर गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. कोरोनाची भीती अजूनही कायम असली तरी मे महिन्यात लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता न आल्याचा वचपा काढण्याची पुरती तयारी मुंबईकरांनी केल्याचे दिसत आहे.
गुरुवारी रात्रीपासून मुंबईतून हजारो वाहने विविध ठिकाणी रवाना झाली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-नाशिक महामार्गावर आणि कोल्हापूरमार्गे कोकणच्या दिशेने जाणारे रस्ते त्यामुळे ट्रफिक जॅम झाले. वाहतूक विस्कळीत झाली. या वाहनांमध्ये खासगी कार आणि टुरिस्ट वाहनांची संख्या अधिक आहे. कोरोनाची भीती अजून कायम असतानाही पर्यटकांचा हा जीवघेणा उत्साह पाहून प्रशासनाची मात्र झोप उडाली आहे.
कसारा घाटात वाहनांच्या रांगा लागल्याने नाशिकच्या दिशेने निघालेले प्रवासी अक्षरशः हैराण झाल्याचे दिसत होते. कसारा घाटात रस्त्यावर डांबर टाकण्याचे काम सुरू असल्याने अवजड वाहने जागीच अडपून पडली. ती वाहतूककोंडी सोडवताना आपत्ती व्यवस्थापनाची पथके, पोलीस आणि महामार्ग पोलिसांची पुरती दमछाक झाली. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचा ताफाही या वाहतूककोंडीत तासभर अडपून पडला होता. घोटी टोल नाक्यावर भुजबळ हे स्वतः गाडीतून खाली उतरले आणि वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले.
मुरुड-जंजिरा किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद
मुंबईपासून जवळच असणाऱ्य़ा रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड-जंजिरा येथील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मुरुड-जंजिरा किल्ल्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ लागले होते. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापराचे नियम त्यांच्याकडून पाळले जात नव्हते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते योग्य नसल्याने रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जंजिरा किल्ल्याचे दरवाजे 2 जानेवारीपर्यंच पर्यटकांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे रायगडमधील समुद्रकिनाऱ्य़ांवर गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.
लोणावळ्यात नाईट कर्फ्यू
खंडाळा लोणावळ्यातील रिसॉर्ट नववर्षाआधी हाऊसफुल्ल असतात. यंदा कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाला तिथे निर्बंध घालावे लागले आहेत. लोणावळ्यात पर्यटकांची होणारी गर्दी पाहून तिथे नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तेथील टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट 31 डिसेंबरला पर्यटकांनी गजबजून जातो.
लोणावळ्यासह पुणे जिल्ह्यातील लवासा, मुळशी डॅम, अॅम्बी व्हॅली, खडकवासला, सिंहगड, ताम्हिनी घाट येथे नववर्षाच्या पार्टीसाठी पर्यटकांची गर्दी होते. त्यामुळे या भागातही 5 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.
शिर्डी, कोल्हापूर, तुळजापुरात भाविकांची झुंबड
2020 हे वर्ष कोरोनामुळे दुःखात गेले आता येणारे 2021 हे वर्ष सुरक्षित आणि आनंदात जावो अशी प्रार्थना करण्यासाठी हजारो भाविकांची शिर्डी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि तुळजापूरच्या भवानीच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे.
महालक्ष्मी मंदिरात तर भाविकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियमही धाब्यावर बसवल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन अॅलर्ट झाले असून गर्दीवर नियंत्रणासाठी निर्बंध लावले गेले आहेत.
कोकण मार्गावर वाहनांच्या रांगा
कोकणात जाणाऱ्य़ा सर्वच घाटरस्त्यांवर आज ट्रफिक जॅम झाले होते. मे महिन्यात आणि गणपतीमध्ये गावी जाता न आलेल्या चाकरमान्यांनी नववर्षानिमित्त गावी जाण्याचा पर्याय स्वीकारला. त्यामुळे कशेडी घाट, गगनबावडा, फोंडासह कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्य़ा रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली.
‘फास्टॅग’द्वारे एकाच दिवसात विक्रमी 80 कोटी टोल जमा
महामार्गाने प्रवास करणाऱ्य़ांना त्यांच्या वाहनांना 1 जानेवारी 2021 पासून फास्टॅग लावणे केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. फास्टॅग लावल्याने प्रवाशांचा टोल नाक्यावरचा वेळ वाचणार आहे. त्यांचा टोल डिजिटली जमा होत आहेत. आतापर्यंत 2.20 कोटी फास्टॅग वितरीत करण्यात आले आहेत. नाताळ आणि नववर्षासाठी बाहेर फिरायला जाण्याचा ट्रेंड देशभरात आहे.
देशभरातील लाखो नागरिक आऊटिंगसाठी निघाले आहेत. त्यातील अनेकांच्या वाहनांना फास्टॅग आहे. या फास्टॅगद्वारे 24 डिसेंबरच्या एका दिवसात 80 कोटी रुपये टोल जमा झाला. त्यादिवशी फास्टॅगद्वारे 50 लाख डिजिटल व्यवहार झाले. एका दिवसात इतका टोल जमा होणे हा विक्रम आहे. देशभरातील 30 हजार ठिकाणी हे फास्टॅग विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.































































