
एच-1बी व्हिसा मिळवण्यात अडचणी येत आहेत, पण अमेरिकेने नेहमीच स्थलांतरित कुशल कामगारांचे स्वागत केले आहे. माझ्या पालकांनी इतर स्थलांतरितांप्रमाणे अमेरिकेच्या विकासात योगदान दिले.
भारत नेहमीच माझ्या हृदयाजवळ राहिला आहे. माझी सुरुवात भारतातून झालीय. युगांडानंतर मी आता अमेरिकेत आहे. मी भारतीय संस्कृतीत वाढलो. खरे म्हणजे माझी पहिली ओळख ही भारतीय आहे, असे विधान न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी केले आहे. ममदानी यांनी पहिल्यांदाच एका हिंदुस्थानी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर भाष्य केले.
न्यूयॉर्कमध्ये स्थलांतरितांच्या तपासणीच्या नावाखाली इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंट (आयसीई) कडून अटक केली जात आहे. स्थलांतरितांना त्रास दिला जात आहे. मी फेडरल एजन्सी आयसीईला स्पष्ट सांगितले आहे की, अमेरिकेतील कायदा मोडण्याचा अधिकार ना एजंटना आहे, ना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जगात सर्वात मोठे निर्गमन सुरू करण्याचा दावा करतात, पण मी न्यूयॉर्कच्या लोकांसोबत आहे. आयसीईच्या छाप्यांमध्ये न्यूयॉर्क पोलीस सहभागी होणार नाहीत. तसेच बेकायदेशीर कारवाई न्यूयॉर्कमध्ये होऊ दिली जाणार नाही. भारतीय वारसा मला सांस्कृतिक विविधता, लोकशाही, राजकीय सत्ता आणि मायग्रेशनबद्दल जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रदान करतो, असे ममदानी या वेळी म्हणाले. न्यूयॉर्कचा पहिला भारतवंशीय महापौर बनणे निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे, पण येणाऱया दिवसांत मी जे काही करेन, त्यातून माझ्या निवडीची सार्थकता स्पष्ट होईल.























































