देश – विदेश – गुजरातमध्ये 22 कोटींची अल्प्राजोलम जप्त

गुजरातच्या वलसाडमध्ये एका कारखान्यावर छापा टाकून डीआरआयने 22 कोटी रुपये किमतीची अल्प्राजोलम जप्त केली आहे. या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. अल्प्राजोलम एक प्रिस्क्रिप्शन औषध आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार याचा वापर मानसिक रुग्ण किंवा चिंता कमी करण्यासाठी केला जातो. विनापरवानगी या औषधांच्या विक्रीवर बंदी आहे. या कारखान्यामध्ये गैर पद्धतीने अल्प्राजोलम बनवले जात होते. गुजरातमध्ये तयार करून याची विक्री तेलंगणामध्ये करण्यात येणार होती.

केदारनाथबद्रीनाथमध्ये पहिली बर्फवृष्टी

उत्तराखंडमधील केदारनाथ आणि बद्रीनाथ धाममध्ये मोठी बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टीमुळे या परिसरात कडाक्याची थंडी पडली आहे. हेमकुंड साहीब व बद्रीनाथ धाममध्ये बर्फवृष्टी झाल्याने या ठिकाणी चारही बाजूंनी जणू काही बर्फाची चादर पसरली आहे, असे चित्र दिसत आहे. बद्रीनाथमध्ये सगळीकडे एक ते दीड फुटांपर्यंत पांढराशुभ्र बर्फ साचलेला दिसत आहे. हे दृश्य टिपण्यासाठी पर्यटकांमध्ये चढाओढ लागली आहे. 25 नोव्हेंबरला बद्रीनाथ धामचे कपाट बंद होणार आहेत.

मंगोलियात अडकलेले 245 हिंदुस्थानी परतले

मंगोलियाची राजधानी उलानबटेर येथे अडकलेले एअर इंडियाचे 245 प्रवासी अखेर दोन दिवसांनंतर दिल्लीत परतले. सॅन फ्रान्सिस्कोहून दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे एअर इंडियाच्या एआय 174 विमानाला मंगोलियामध्ये इमर्जन्सी लँडिंग करावी लागली होती. या विमानात 228 प्रवासी आणि 17 क्रू मेंबर होते. या सर्वांना दोन दिवसांनंतर सुखरूप हिंदुस्थानात आणले गेले आहे.

झाकीर नाईकला बांगलादेशात नो एन्ट्री

मूळचे हिंदुस्थानी असलेले आणि वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकला बांग्लादेशच्या सरकारने ढाकात नो एन्ट्री देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हिंदुस्थान सरकारच्या विरोधानंतर बांग्लादेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. बांग्लादेशच्या कायदा-सुव्यवस्था कोर कमिटीने नुकत्याच झालेल्या बैठकीत झाकीर नाईक याला एन्ट्री न देण्याचा निर्णय घेतला. झाकीर नाईक बांग्लादेशात आल्यास त्या ठिकाणी मोठी गर्दी होईल, या गर्दीवर नियंत्रण मिळवणे अवघड होईल. त्यामुळे एन्ट्री देता येणार नाही, असे म्हटले आहे.

चीनच्या झिंजियांगमध्ये भूकंपाचे धक्के

चीनच्या झिंजियांगमध्ये गुरुवारी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल इतकी होती. हा भूकंप गुरुवारी सकाळी 6 वाजून 32 मिनिटांवर झाला. 220 किलोमीटर खोल भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली. भूकंपामुळे किती नुकसान झाले आहे, याची माहिती अद्यापर्यंत समोर आली नाही. 1900 पासून आतापर्यंत चीनमध्ये भूकंपामुळे 5 लाख 50 हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत.